तिरुपती बालाजीच्या लाडू मध्ये जनावरांची चरबी, मुख्यमंत्री नायडू यांचा आरोप, तपासणीनंतर खळबळजनक रिपोर्ट
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भारतातील तिरुपती बालाजी या जगप्रसिद्ध मंदिर असलेल्या प्रसादाच्या लाडूमध्ये तुपा ऐवजी जनावरांच्या चरबीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता. या आरोपानंतर राजकीय वातावरण देखील तापले असून मोठी खळबळ उडाली आहे. तसेच नायडू यांच्या आरोपानंतर एक रिपोर्टही समोर आला आहे. या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तिरूपती बालाजी हे भारतातील जगप्रसिद्ध मंदिर असून विविध ठिकाणांहून अनेक लोक इथे दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. या मंदिराचं व्यवस्थापन तिरुमला तिरुपती देवस्थानम द्वारे केलं जातं. या मंदिरात प्रसाद म्हणून लाडू दिले जातात. याच लाडूच्या प्रसादाबाबत चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा केला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू एका कार्यक्रमा दरम्यान म्हणाले होते की, प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी आणि निकृष्ट दर्जाचे घटक वापरण्यात आले आहेत.जग मोहन रेड्डी च्या काळात तिरुपती मंदिराच्या प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी मिसळली जात होती, असा आरोप नायडू यांनी केला होता. त्यानंतर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. आता तपासानंतर अहवाल समोर आला असून त्यात जनावरांची चरबी आणि फिश ऑइल सापडल्याचे सांगण्यात आले आहे.
आता तेलुगु देसम पक्षाने यासंदर्भातील प्रयोगशाळेचा एक रिपोर्ट समोर आणला आहे. या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये असं उघड झालं आहे की, तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी, फिश ऑइल आणि बीफ टॅलोचा समावेश होता. या प्रयोगशाळेचा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आम्ही आता तिरुमला लाडूच्या प्रसादासाठी शुद्ध तुपाचा वापर करत आहोत. TDP सरकार तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या (TTD) पावित्र्याच्या संरक्षणासाठी कठोर मेहनत करत आहेत,’ असा दावा नायडू यांनी केला.