कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अंतर्नादची पुष्पांजली प्रबोधनमाला
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळात माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुष्पांजली प्रबाेधनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात भुसावळ तालुक्यातील विद्यालय आणि महाविद्यालयांमध्ये हे व्याख्यान होणार आहेत. यंदा व्याख्यानमालेचे सातवे वर्ष आहे.
प्रबाेधनमालेचे प्रथम पुष्प १९ डिसेंबरला दुपारी ३ वाजता के.नारखेडे विद्यालय, भुसावळ येथे होणार असून खिरोदा येथील प्रा. साहेबराव भुकन हे गुंफतील. ‘चला व्यक्तिमत्व घडवू या’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. ते मराठी आणि शिक्षणशास्त्रातील एम.ए., सेट, पीएच.डी. धारक असून, ३० वर्षांचा अध्यापन अनुभव आहे. ते जनता शिक्षण मंडळ संचलित संस्थेत कार्यरत असून, त्यांचे अनेक संशोधन पेपर्स प्रकाशित झाले आहेत.
द्वितीय पुष्प २० डिसेंबरला दुपारी १२:३० वाजता जी.एस.चौधरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वरणगाव येथे होणार असून फैजपूर येथील कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत हे गुंफतील. ‘गगन कवेत घेवूया’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. ते सहयोगी प्राध्यापक आणि एनसीसी अधिकारी असून, गेल्या १६ वर्षांपासून इंग्रजी भाषा व साहित्य या विषयाचे अध्यापन करत आहेत. त्यांचे १०० हून अधिक कॅडेट्स सशस्त्र दलात आणि अनेक विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. अनेक सामाजिक प्रकल्पांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
तृतीय पुष्प २१ डिसेंबर राेजी सकाळी ९:३० वाजता राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुऱ्हे, ता. भुसावळ येथे जळगाव येथील डॉ.जयदीप पाटील हे ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या विषयावर पुष्प गुंफतील. ते नोबेल फाउंडेशनचे संस्थापक असून, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी इस्रो भेटींचे आयोजन करतात. १२०० व्याख्यानांतून ७ लाख विद्यार्थ्यांचे प्रबोधन त्यांनी केले आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी नवनवे उपक्रम राबवत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवले आहेत.
अशा तिनही वक्त्यांची व्याख्याने बाेचऱ्या थंडीत ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. रावेर विधानसभेचे आमदार तथा भाजपा जिल्ह्याध्यक्ष अमाेल हरिभाऊ जावळे, जळगावचे उद्याेजक अजय बढे, दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुवेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनात ही प्रबाेधनमाला हाेत आहे. प्रकल्पप्रमुख म्हणून डॉ.संजू भटकर, समन्वयक प्रा.डॉ.श्यामकुमार दुसाने, सहसमन्वयक हितेंद्र नेमाडे आहेत. रसिकांनीही लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष
दरवर्षी ही प्रबाेधनमाला भुसावळ शहर व परिसरातील शाळांमध्ये फिरती होते. उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष आहे. अभिरूची टिकून राहावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या विचारांची रुजवत व्हावी म्हणून या वर्षी ही प्रबाेधनमाला हायस्कुल आणि कॉलेज मध्ये हाेत आहे, असे प्रकल्प प्रमुख डॉ.संजू भटकर यांनी सांगीतले.
आजपर्यंत यांची झाली व्याख्याने
चांदवडचे विष्णू थाेरे, नाशिकचे प्रमाेद अंबडकर, एरंडाेलचे प्रा. वा.ना.आंधळे, चाळीसगावचे मनाेहर आंधळे, धरणगावचे डाॅ. संजीवकुमार साेनवणे, वाशिमच्या उज्ज्वला माेरे, भुसावळचे जीवन महाजन, पुण्याचे देवा झिंजाड, अमरावतीचे नितीन देशमुख, साेलापूरचे नितीन चंदनशिवे, जळगावचे मनाेज गाेविंदवार, पाचाेऱ्याचे रवींद्र पाटील, नागपूरच्या प्रा.विजया मारोतकर, अकोला येथील अनंत राऊत, जळगावचे ज्ञानेश्वर शेंडे, महेश गोरडे, सावद्याचे प्रा.व.पु.होले अशा अनेक दिग्गज वक्त्यांची व्याख्याने या प्रबाेधनमालेत आजपर्यंत झाली आहेत.
नियोजन समिती
ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, जीवन महाजन, प्रदीप सोनवणे, प्रसन्ना बोरोले, शैलेंद्र महाजन, अमितकुमार पाटील, विक्रांत चौधरी, समाधान जाधव, भूषण झोपे, अमित चौधरी, राजू वारके, कुंदन वायकोळे, देव सरकटे, तेजेंद्र महाजन, राहुल भारंबे ,ललित महाजन, निवृत्ती पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, जीवन सपकाळे, हरीश भट, सचिन पाटील, प्रमोद पाटील, मंगेश भावे, उमेश फिरके, शिरीष कोल्हे, केतन महाजन, कपिल धांडे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील.