अबब… तब्बल ८ लाखांची लाच घेतांना लाचखोर महिला शिक्षणाधिकारी एसीबीकडून रंगेहात अटक
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्यासाठी तडजोडीअंती ८ लाखांची लाच स्वीकारणार्या नाशिक जिल्हा परीषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचा ड्रायव्हरला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली ठाणे लाचलुचपत विभागाच्या या कारवाईत शिक्षण विभागाचा वरिष्ठ दर्जाचा एक मोठा अधिकारी जाळ्यात अडकल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्यासाठी एकूण ९ लाख रुपयांची लाच मागितली होती. यात तडजोड करत ८ लाख रुपयांवर देण्याचे ठरले. त्यानुसार नाशिक जिल्हा परीषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली पंकज झनकर-वीर यांनी यासंदर्भात कारचालक ज्ञानेश्वर येवले यांना भेटण्यास सांगितले. परंतु तक्रारदाराने ठाणे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. आरोपी शिक्षणाधिकारी यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार मंगळवार (दि.10) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चालकास जिल्हा परीषदेजवळील सिग्नलजवळ ८ लाखांची लाच स्वीकारताच शिक्षणाधिकारी वैशाली पंकज झनकर-वीर (44) यांच्यासह शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांना ठाणे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.
तसेच या प्रकरणात सहभागी असलेला राजेवाडी (ता.नाशिक) येथील प्राथमिक शिक्षक पंकज रमेश दशपुते यांचा शोध पथक घेत आहेत. ठाणे विभागाच्या पोलीसांनी नाशिकमध्ये येवून ही कारवाई केल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या ठाणेच्या निरीक्षक पल्लवी ढगे.पाटील, हवालदार मोरे, लोटेकर, शिंदे , अश्विनी राजपूत, सुतार, चालक शिंदे आदींच्या पथकाने यशस्वी केला.