२७ हजाराची लाच भोवली : पोलीस उपनिरीक्षकासह रिक्षाचालक एसीबीच्या जाळ्यात
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी रिक्षाचालकामार्फत २७ हजार रुपयाची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह रिक्षाचालकाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ माजली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, तक्रारदार यांच्यावर जायखेडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस दुरक्षेत्र नामपुर येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये कारवाई न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी नामपुर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मुरलीधर नवगिरे यांनी ३० हजार रुपयांची लाच मागणी तक्रारदार यांच्या कडे केली. मात्र शेवटी तडजोडीअंती २७ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार यानी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता सापळा लावला यांत पोलीस उपनिरीक्षक नवगिरे यांनी लाचेची रक्कम रिक्षाचालक रमेश गरुड याच्याकडे देण्यास सांगितली. त्यानुसार बुधवारी रिक्षाचालक रमेश करचु गरुड (रा. काकडगाव ता. बागलाण, जि. नाशिक) याला पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे यांच्यासाठी २७ हजार रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी
दोघां विरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.