बार मालकांकडून ४० हजाराची लाच : राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यासह पंटर ACB च्या जाळ्यात
Monday To Monday NewsNetwork
नागपूर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : बार रेस्टॉरंटमधील स्टॉक रजिस्टर व गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालामध्ये तफावत असल्याचे दाखवून कारवाई करणाचा धाक दाखवत कारवाई न करण्यासाठी ४० हजार रुपयाची लाच स्विकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यासह त्याच्या खाजगी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे परवाना असलेले बार रेस्टॉरंटमध्ये दुय्यम निरीक्षक संजय केवट यांनी तुमच्या स्टॉक आणि गोडाऊनमधील मालामध्ये तफावत असल्याचे सांगून ५० हजार रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीमध्ये ४० हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पडताळणीमध्ये ४० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी (दि.9) मलकापूर अर्बन बँकेसमोर पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संजय उत्तमराव केवट (वय-46) आणि खासगी व्यक्ती प्रशांत बाबुराव सांगोले (रा. देवीनगर वडाळी) अशी लाच घेताना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, सतीश उंबरे, सुनील वऱ्हाडे, युवराज राठोड, महेंद्र साखरे, अभय वाघ, तुषार देशमुख, निलेश महिंगे, सतीश किटुकले, चंद्रकांत जनबंधू, उपेंद्र थोरात यांनी केली.