राज ठाकरेंची सभा ठरल्याप्रमाणेच होणार– मनसेकडून माहिती
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची येत्या महाराष्ट्र दिनी होऊ घातलेली जाहीर सभा ठरल्याप्रमाणेच होणार आहे. यात कोणताही बदल होणार नाही, असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे. पोलीस प्रशासनाकडून शस्त्र बंदीचे आदेश देण्यात आले आहे.
औरंगाबादमधील सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नसली तरीही काही दिवसात परवानगी मिळेल, आमचे सगळे पदाधिकारी 28 एप्रिलपासूनच औरंगाबादला जाणार आहेत. औरंगाबादमध्ये शांतता भंग करणं किंवा लॉ-ऑर्डर पालन न करणं, असं काही होणार नाही… आमची सभा अत्यंत शांततेत पार पडेल, राज ठाकरेंची सभा दणक्यात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शांतता राखण्यासाठी पोलिसांनी आदेश काढलेले असून त्यात मनसेला विरोध करण्याची भूमिका नसावी, असंही सरदेसाई यांनी म्हटलं. नितीन सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
नितीन सरदेसाई म्हणाले, ‘ काही दिवसांपूर्वी मी सोशल मीडियावर बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ पाहिला होता. ज्यात ते भोंग्यांच्या संदर्भात बोलत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील ती क्लिप पहावी म्हणजे बाळासाहेबांचे भोंग्यांच्या बद्दल काय मत आहे हे मुख्यमंत्र्यांना देखील कळेल. त्यांची भूमिका बदलली असेल तर त्यांचा पक्ष तोच आहे की नाही अशी शंका निर्माण होईल. आम्ही ज्या ठिकाणी हनुमान चालीसा म्हणतोय ती बंद पाडण्याचा पोलीस प्रशासनाचा प्रयत्न दिसतोय. हिंदुत्व असतं तर विरोध का केला असता? मुख्यमंत्र्यांनी आपल्या बोलण्याचा विचार केला पाहिजे. आपल्या बोलण्यात आणि कृतीत किती फरक आहे त्यांनी पहावं, असा सल्लाही नितीन सरदेसाई यांनी दिला.