नवऱ्याची नजर चुकवून दागिने घेऊन पळालेल्या नवरीचे 6 महिन्यात 6 लग्न! मोठे रॅकेट उघड
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
औरंगाबाद,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। खुलताबाद तालुक्यातील नवदाम्पत्य दौलताबाद किल्ला पहायला गेले असता लग्न झालेल्या नवऱ्याला सोडून अचानकपणे पळून गेलेल्या नवरीमार्फत मराठवाड्यातील एक मोठे रॅकेट उघड झाले आहे. लग्न होत नसलेल्या मुलाचे कुटुंबांना टार्गेट करत दोन ते पाच लाखात वधू विकणारे हे रॅकेट मराठवाडा, खान्देशासह गुजरातमध्येही पसरले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. जळगाव शहरातील दोन महिला हे रॅकेट चालवतात. या दोघींनी स्वतःच्याच भाचीचे सहा महिन्यात तब्बल सहा वेळा लग्न लावले. अमळनेर येथे त्यांचे बिंग फुटले अन् मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही रॅकेट चालवणारी टोळी मात्र अद्याप फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपासासाठी मुलीला दौलताबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पती नवं वधू सह दौलताबाद चा किल्ला बघायला गेलं असता वधू अंगावरील 70 हजराच्या दागिन्यांसह नवऱ्याची नजर चुकवून पसार झाल्याची बातमी ” मंडे टू मंडे न्युज ” ने दि.6 एप्रिल रोजी प्रसारित केली होती.
उघड झाले रॅकेट?
26 मार्च रोजी दौलताबादजवळील मावसाळा गावातील एका कुटुंबाला फसवल्यानंतर 20 वर्षीय तरुणीने तेथून पळ काढला. अमळनेर गाठले. तेथे 6 एप्रिल रोजी दुसऱ्या एका मुलासोबत लग्न केले. तोपर्यंत दौलताबादमधील प्रकार सोशल माडियावर व्हायरल झाला होता. सरिता आणि या रॅकेटमधील काही सदस्यांचे फोटो अमळनेर येथील लोकांनी पाहिले. मित्रासोबत लग्न करणारी मुलगी तीच असल्याचा संशय आला. तपासणी केलानंतर या मुलीने मावसाळा येथील तरुणाला फसवल्याचे सांगितले. कुटुंबियांनी तरुणीला कळू न देता पोलिसांना बालावले. पोलीस घरी येताच तरुणी बिथरली. तिने रॅकेटमधील इतर सदस्यांना ही माहिती दिली. या रॅकेटने मुलाच्या कुटुंबाकडून घेतलेले 2 लाख परत पाठवले आणि पोबारा केला. अमळनेरमध्ये याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही. हा प्रकार दौलताबाद पोलिसांना कळताच त्यांनी 10 एप्रिल रोजी तरुणीला ताब्यात घेतले.
अनेक कुटुंबांना फसवलं या महिलांच्या रॅकेटने
अंमळनेर येथून अटक झालेल्या तरुणीने खोटे लग्न लावून देत पैसे उकळणाऱ्या या रॅकेटमध्ये दोन महिला असल्याचे सांगितले. आशा गणेश पाटील, लता बाबूराव पाटील, रिंकू पाटील आणि अंड्यावाल्या काकू (सर्व रा. पांडे चौक, जळगाव) आणि बाबूराव रामा खिल्लारे (रा. हिंगोली) हे मिळून चालवतात, अशी माहिती दिली आहे. दोन वर्षांपूर्वी आशाबाई आणि लताबाईच्य रॅकेटने जळगावात बनावट लग्न लावल्याप्रकरणी शनिवार पेठ ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या दोघींना अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर सुटताच त्यांनी गुन्हा हा धंदा सुरु केल्याचे अटक केलेल्या तरुणीने सांगितलं.
मावशी मास्टरमाइंड
दरम्यान, मी अनाथ असून आशा आणि लता यांनी माझा सांभाळ केला. मावशीच्या सांगण्यावरून मी हे लग्न करते. आतापर्यंत सहा लग्न केले असून एका लग्नासाठी दोन ते पाच लाख रुपये मिळतात, अशी कबूली तरुणीने दिली आहे. अशा प्रकारे लग्न झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसतो, असेही तिने सांगितले. यापैकी एका तरुणाने विष घेतले तर दुसरा आजारी असल्याचेही तिने सांगितले. या रॅकेटवर दौलताबाद पोलीस ठाण्यात फसवणूक, विश्वासघात, संघटित गुन्हा या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.