गुटका खाणे तरुणांच्या जीवावर बेतले,वाचा सविस्तर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
औरंगाबाद,मंडे टू मंडे वृत्तसेवा। गुटखा खाणे आरोग्यास अपायकारक असते अशा सूचना वारंवार केल्या जातात. पंरतु त्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. राज्यात गुटखा विक्री बंद असतानाही अनेक जण चोरी चुपे मार्गाने गुटख्याची विक्री करत असून गुटख्याचे शौकीन आपली हौस भागवण्यासाठी ते जास्त किंमत देऊन विकतही घेत आहेत.
अशातच एका तरुणाला गुटखा खाणे चांगलेच महागात पडले आहे. काम करतांना एका तरुणाने गुटखा खाल्ला आणि त्याला तेव्हाच जोराचा ठसका लागल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. गणेश जगन्नाथदास वाघ असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो एका खाजगी कंपनीत कामाला होता. कंपनी मालकाच्या घरी गणेश डिश टीव्ही बसवण्यासाठी गेला असता गणेशला गुटखा खाण्याची सवय असल्याने डिश टीव्ही बसवत असताना त्याने नेहमीप्रमाणे आपल्या खिश्यातुन गुटख्याची एक पुडी फोडून ती खाल्ली आणि याचवेळी त्याला अचानक ठसका लागला आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या तरुणाला रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
दरम्यान शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, गणेशच्या अन्ननलिकेत सुपारीअडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच समोर आले आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी देखील गुटख्याच्या विळख्यात अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गणेशच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून गणेशच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.