TET Scam: “या” मंत्र्याच्या शिक्षण संस्थेतील १२ शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र; दानवेंचा दावा
औरंगाबाद,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळा (TET Scam) प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. यापूर्वी टीईटी घोटाळा प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे देखील समोर आली होती. मात्र सत्तार यांनी सर्व आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. सत्तार यांच्या मुलींचीं नावे टीईटी घोटाळ्यात समोर आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळणार का याबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात सत्तार यांना स्थान देण्यात आलं. आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
काय म्हटलंय दानवेंनी? दानवे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यांवर गंभीर आरोप केला आहे. नॅशनल एज्युकेशन सोसायटी ही सत्तारांची शिक्षण संस्था आहे. या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे देखील आली होती. मात्र अब्दुल सत्तार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत बोलताना माझ्याकडे अब्दुल सत्तार यांच्या मुलींच्या पगाराची कागदपत्र असल्याचा दावा देखील अंबादास दानवे यांनी केला आहे.
चौकशीची मागणी
अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील आणखी बारा शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र आहे. असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. सोबतच सत्तार यांची या प्रकरणात चौकशी झाली पाहिजे असं देखील दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच सत्तार यांच्या मुलीच्या पगाराची कागदपत्र देखील आपल्याकडे असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.