आमचा रंग ओरिजनल,शिवसेनेचा रंग फिका,दानवेंचे राऊतांना प्रत्युत्तर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
औरंगाबाद,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आमचा रंग ओरिजनल आहे. कुणाचा रंग कसा आहे, हे निवडणुकीत ठरतं. शिवसेनेनं दाऊदच्या माणसाला साथ दिली तेव्हाच त्यांचा रंग फिका पडलाय अशी फटकेबाजी भाजप नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या रंगात भेसळ आहे, असं वक्तव्य नुकतंच केलं असून त्याला रावसाहेब दानवे यांनी हे प्रत्युत्तर दिलं. होळीनिमित्त टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींशी त्यांनी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत सर्व प्रश्नांना खुमासदार उत्तरं दिली. रावसाहेब दानवे यांचा आज वाढदिवसदेखील आहे, त्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना आज शुभेच्छा दिल्या. दानवे यांच्या घरी आज धुळवड आणि वाढदिवस असा दोन्ही दिवसांचे खास सेलिब्रेशन रंगले होते.
माझं नेहमीच कलरफुल असतं होळीच्या निमित्ताने प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘ मी वाढदिवस कधीच साजरा करत नाही पण होळीच्या दिवशी वाढदिवशी आल्यामुळे लोक मला शुभेच्छा द्यायला येत आहेत. लहानपणी आम्ही खूप होळी साजरी करायचो, गोवऱ्या गोळा करायचो बोंब ठोकायचो ज्याच्यासंग भांडणं त्याच्या नावाने बोंब ठोकायचो, अशी आठवण दानवे यांनी सांगितली.
शरद पवारांची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी- दानवे
महाविकास आघाडी सरकारने नवाब मलिका यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी यावेळी दानवे यांनी केली. ते म्हणाले, आता राज्यातलं वातावरण गढूळ आहे, दाऊद इब्राहिम ला मदत करणाऱ्या त्यांच्या प्रॉपर्टीचे डिलिंग करणारा माणूस त्या माणसाचा राजीनामा घेतला पाहिजे, या गोष्टीवर जनता लक्ष ठेऊन आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपली जबाबदारी पार पडावी त्यांनी बाहेर पडावे आणि काम करावं मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी पण ते करत, पण जे दाऊदला मदत करतात त्यांना हे सध्या मदत करत आहेत, त्यांनी या मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शरद पवार यांनी काँग्रेस सेना आणि राष्ट्रवादीचे कान धरले पाहिजे मात्र शरद पवारांची सध्याची अवस्था मजबुरी का नाम महात्मा गांधी अशी झाली आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
संजय राऊतांना प्रत्युत्तरः आमचा रंग ओरिजनल
दरम्यान, संजय राऊत यांच्यावर खुमासदार टीका करताना रावसाहेब दानवे म्हणाले, ‘ आमचा रंग ओरिजिनल आहे, रंग कुणाचा चांगला आहे, हे निवडणुकीत ठरतं, शिवसेनेचा रंग तेंव्हाच फिका पडला जेव्हा त्यांनी दाऊदच्या माणसाला साथ दिली. आमचं सरकार येणार आहे, आणि पुढची 25 वर्षे आमचं सरकार टिकणार आहे. काँग्रेस मध्ये आता काहीही बदल होऊ शकत नाही, काँग्रेस हा आता प्रादेशिक पक्ष सुद्धा राहिलेला नाही आप आणि काँग्रेस बरोबरीत आलेले आहेत, असं वक्तव्य दानवे यांनी केलं.