जळगावशैक्षणिक

भारत सरकार वस्त्र मंत्रालयातर्फे शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात शिल्प प्रदर्शनासह जागरूकता कार्यक्रम संपन्न

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयातर्फे आयुक्त, विकास कार्यालय आणि हस्तशिल्प सेवा केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यांसाठी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. जळगाव जिल्ह्यातून या प्रशिक्षणासाठी जळगाव शहरातील शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयाची निवड करण्यात आली होती. दिनांक १३ ते १५ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात शाळेतील १०४ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.


कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहसचिव मा. मीराताई गाडगीळ व कार्यकारिणी सदस्या तथा समन्वयिका सौ. विजयालक्ष्मी परांजपे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, पर्यवेक्षक श्री. प्रशांत जगताप, हस्तकला सेवा केंद्र छत्रपती संभाजीनगर चे आयुक्त श्री. अमन कुमार जैन, आयोजक श्री. शैलेंद्र सिंग, श्री. उमेश भावसार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.


या प्रशिक्षण कार्यक्रमात हस्तकलेच्या विविध प्रकारांचे चित्रफीत व प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या कलांचे महत्त्व व भविष्यातील रोजगाराच्या संधी या बद्दल जाणीवजागृती करतांना वारली चित्रकला, सोलापूरी चादर याची चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवली. मूर्तीकला, लाखेच्या बांगड्या, तांब्याचे दिवे, रेशमी धाग्यांचे नक्षीकाम, चित्रकला यांचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण अनुक्रमे श्री.भगवतीप्रसाद सूर्यवंशी, हबीब मणियार, कैलास सोनवणे, हेमलता चव्हाण यांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांकडूनही काही हस्तकलेच्या वस्तू बनवून घेतल्या. उत्कृष्ट सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व हस्तकलेच्या वस्तू देऊन प्रशिक्षणाच्या शेवटी गौरविण्यात आले.

हा कार्यक्रम संस्थेच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
” विद्यार्थ्यांनी जीवनात कला आत्मसात केल्या पाहिजेत, कला माणसाला समाजात आदराचे स्थान मिळवून देते. कलेमुळे माणूस घडतो, कलेमुळे माणूस समाजाभिमुख बनतो. आपल्या जगण्यात कलेमुळे वेगळा आनंद अनुभवता येतो”. असे हस्तकला सेवा केंद्र छत्रपती संभाजीनगर चे आयुक्त श्री अमन कुमार जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. संजय भारूळे, पर्यवेक्षक श्री. प्रशांत जगताप, श्री. संजय वानखेडे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. ए. व्ही. चौधरी यांनी केले. श्री. योगेश सोन्जे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन श्री. सोमनाथ महाजन यांनी केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!