अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा : असं आहे वेळापत्रक, कोण-कोण सहभागी होणार
अयोध्या, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला 7 हजार जणांना निमंत्रण देण्यात आलं आहे, यात 3 हजार जण व्हीव्हीआयपी आहेत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठीचं वेळापत्रकही निश्चित करण्यात आलं आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं वेळापत्रक
सकाळी 10.25 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अयोध्या विमानतळावर आगमन होईल.
10 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान अयोध्या हेलिपॅडवर पोहोचतील.
10 वाजून 55 मिनिटांनी पंतप्रधानांचं श्रीराम जन्मभूमीवर आगमन होईल.
11 ते 12 ही वेळ आरक्षित ठेवण्यात आली आहे.
दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरूवात होईल.
12 वाजून 55 मिनिटांनी पंतप्रधान पूजा स्थळावरून प्रस्थान करतील.
दुपारी 1 वाजता पंतप्रधानांचं सार्वजनिक कार्यक्रमस्थळी आगमन होईल.
दुपारी 1 ते 2 या वेळेत पंतप्रधान अयोध्येतल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार.
दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान कुबेर टिलाचं दर्शन घेतील.
मंदिराच्या गर्भगृहात पाच वर्षांच्या रामलल्लाचा 51 इंचाचा पुतळा स्थापित केला जाणार आहे. या मूर्तीचा रंग सावळा आहे. यात 5 वर्षांच्या बालकाच्या स्वरुपातील श्रीराम कमळावर विराजमान होतील. कमळाच्या फुलासह मूर्तीची उंची आठ फूट आहे. हिंदू धर्मात बालपण हे साधारणतः पाच वर्षं वयापर्यंत मानलं जातं. त्यानंतर मूल सुबुद्ध मानलं जातं. चाणक्य तसंच अनेक विद्वानांच्या मते, पाच वर्ष वयापर्यंत मुलाची प्रत्येक चूक माफ केली जाते. कारण ते समजूतदार नसतं. या वयापर्यंत केवळ त्याला शिकवण्याचं काम केलं जातं. प्राचीन ग्रंथांमध्ये देव आणि महान व्यक्तींच्या बाललीलांचा आनंद त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जास्त आला आहे, त्यामुळे रामलल्लांची मूर्ती 5 वर्षांच्या बालकाच्या स्वरुपात दाखवण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अमरावतीमधून अयोध्येत तब्बल 500 किलो कूंकू आणण्यात आलं आहे. भोपाळमधून फुलं तर मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून तब्बल 4.31 कोटी वेळा राम नामाचा जप असलेला कागद अयोध्यामध्ये आला आहे. या सोहळ्यासाठी 108 फुटाची अगरबत्ती आणि 2100 किलो वजनाची एक खास घंटी देखील तयार करण्यात आली आहे.
कोण-कोण सहभागी होणार
या सोहळ्यासाठी देशभरातील तब्बल आठ हजार लोकांना आमंत्रण देण्यात आलं आहे, जामध्ये अभिनेते, खेळाडू, राजकारणी अशा महत्त्वाच्या लोकांचा समावेश आहे. यातील अनेक जण अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. पाहू्ण्यांना मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं एक महाप्रसादाचं पाकिट दिलं जाणार आहे. ज्यामध्ये दोन लाडू, शरयू नदीचं पाणी अक्षता आणि सुपारी यांचा समावेश असणार आहे.