केळी पिक विमा घोटाळा : ४५ हजार हेक्टरवर बोगस केळी पिक विमा, ३७ कोटींची विमा रक्कम जप्त, ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, जळगाव जिल्ह्यात खळबळ
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित केळी पीकविमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. कृषी विभागाने ‘एमआरसॅक’च्या मदतीने सॅटेलाईटद्वारे केलेल्या पडताळणीत तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस केळी विमा काढल्याचे समोर आले आहे. यात सुमारे ३७ कोटी रुपयांची विमा रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
केळी लागवड नसतानाही सुमारे २७ हजार शेतकऱ्यांनी विमा काढल्याचे आढळून आले आहे. तसेच जवळपास २९ हजार शेतकऱ्यांनी दुसऱ्याच्या शेतजमिनीवर केळी लागवड दाखवून विमा काढल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. या दोन्ही प्रकारांमुळे एकूण ५५ हजार शेतकऱ्यांनी बोगस विमा काढल्याचे समोर आले आहे.या प्रकरणात अर्ज भरताना जमा करण्यात आलेली सुमारे ३७ कोटी रुपयांची विमा रक्कम राज्य शासनाने जप्त केली आहे. तसेच ज्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) केंद्रांवरून हे बोगस फॉर्म भरले गेले, अशा ४८ केंद्र चालकांवरही चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून नोटिसांना मिळालेल्या उत्तरांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे. या कारवाईने बोगस केळी पिक विमा धारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


