अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आळ्या, पालकांमध्ये संताप
नंदुरबार, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात आळ्या आढळल्याची घटना समोर आली. नंदुरबारतील शहादा तालुक्यामधील मुबारकपूर येथील अंगणवाडीतील हा प्रकार असून यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
प्राप्त माहितीनुसार, नंदुरबार मधील शहादा तालुक्यातील मुबारकपूर गावातील अंगणवाडीत मंगळवारी बालकांना पोषण आहाराचे पाकीट वाटण्यात आले. या वाटण्यात आलेल्या पोषण आहारात अळ्या आढळल्याचा प्रकार मुलांच्या लक्षात आल्याने सदरच्या प्रकाराबद्दल माहिती गावातील सरपंच ताईबाई राजेंद्र अहेर यांना मिळली. यानंतर अहेर यांनी तातडीने अंगणवाडीत जाऊन सर्व पोषण आहाराची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांनी त्यांनी थेट म्हसावद बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याला संपर्क करुन अंगणवाडीतील प्रकार सांगितला. धक्कादायक बाब म्हणजे, अंगणवाडीतील मदतनीस महिलेने अळ्या असलेला हाच पोषण आहार शिजवण्यासाठी घेतला होता. मात्र, त्यांनी निरखून पाहिले असता त्यामध्ये आळ्या आढळून आल्या. पोषण आहारात आळ्या आढळून आल्याची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अंगणवाडी धाव घेऊन संताप व्यक्त करत ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.