“भारतीय बच्चों का बैंक” लाखाच्या मोबदल्यात ७ लाखांच्या खेळण्यातील नोटा, अहमदाबादच्या व्यक्तीची मुक्ताईनगर मध्ये फसवणूक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अहमदाबादमधील एका व्यवसायाने टेलर असलेल्या व्यक्तीला १ लाखाच्या मोबदल्यात ७ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवत मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथे बोलावून लुबाडण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. संशयित आरोपींची ७ लाखांच्या लहान मुलांच्या खेळण्यातील ‘भारतीय बच्चों का बैंक’ लिहिलेल्या नोटा देऊन फसवणूक केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून मुक्ताईनगर तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली.
अहमदाबाद येथे व्यवसायाने टेलर असलेल्या तक्रारदार नदीम अब्दुल सलाम सैफी (मूळ रा.हमीरपूर, तांडा, जि.रामपूर, उत्तर प्रदेश, ह.मू. देवराज इण्डस्ट्रीज, नरोल चौक, सीटीएम – लांबा, अहमदाबाद) याना फेसबुक पाहताना त्यांना १ लाख रुपयांच्या मोबदल्यात ७ लाख रुपये मिळतील, या जाहिरातीने भुरळ घातली.
जाहिरातीच्या ७९७२४०३८७३ या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संशयित मनजीतसिंग याने जाहिरातीची पुष्टी करीत त्यासाठी मुक्ताईनगरला यावे लागेल, असे सांगितले. तक्रारदाराने कुरियरने नोटा पाठवाव्यात, असे सांगितल्यानंतर संशयित आरोपीने अशा पद्धतीने नोटा पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर शुक्रवारी दि. १४ मार्च रोजी संशयिताने पुन्हा तक्रारदाराला संपर्क केल्यानंतर शनिवारी दि.१५ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता तक्रारदार नदीम हे रेल्वेने भुसावळात आले.

भुसावळ येथून तक्रारदार नदीम सैफी हे बसने मुक्ताईनगरला आल्यानंतर संशयित आरोपींनी त्यांना घेण्यासाठी रिक्षा पाठवली व धामणगाव येथे आणले. या वेळी १ लाख रुपये दिल्यानंतर त्यांना पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचे प्लॅस्टिक पिशवीत ठेवलेले १४ बंडल देण्यात आले. त्यानंतर तक्रारदार भुसावळात मुक्कामी थांबलेल्या सायली होटेलमध्ये आल्यानंतर त्यांनी रात्री नोटांचे बंडल उघडून पाहिले असता बंडलच्या पहिले व शेवटी पाचशे रुपयांची नोट होती. मात्र आतील बंडलमध्ये ‘भारतीय बच्चों का बैंक’ लिहिलेल्या लहान मुलांच्या खेळण्यातील सर्व नोटा असल्याने तक्रारदाराला मोठा धक्का बसला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रविवारी तक्रारदाराने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी मनजितसिंग उर्फ गोकुळ दशरथ पवार (चारठाणा, ता. मुक्ताईनगर), अविनाश रुबासन पवार (मधापुरी, ता. मुक्ताईनगर) व एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बाजारपेठ पोलिसांनी मुक्ताईनगर पोलिसांची मदत घेत संशयित आरोपी मनजितसिंग उर्फ गोकुळ दशरथ पवार, अविनाश पवार यांना अटक केली. दोघं संशयितांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा