४०० जणांनी अत्याचार केल्या प्रकरणी नायब तहसीलदार,पोलीस, होमगार्ड सह आणखी ८ आरोपींना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
बीड ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतील ४०० जणांनी बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आता एका पोलीस कर्मचाऱ्यासह सेवानिवृत्त नायब तहसीलदार आणि एका होमगार्डला अटक केली आहे. पोलिसांनी ८ जणांना अटक केल्यानंतर तालुक्यात हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर अवघ्या २४ तासात पोलिसांनी ही कारवाई केली .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत मागच्या ६ महिन्यांपासून घराबाहेर पडलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपुर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणात ८ नोव्हेंबरला अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यानंतर यात अनेक धक्कादायक बाबी पुढे येत गेल्या. १७ नोव्हेंबर रोजी या प्रकरणात पोलिसांनी २ महिला दलाल, एका मुख्याध्यापकासह इतर ७ जणांना अटक केली होती. या प्रकरणात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही सहभाग आढळून आला होता. मात्र त्याच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्याने न्यायालयाने संतप्त होत पोलिसांवर ताशेरे ओढून आरोपीला अटक का होत नाही? असा प्रश्न उपस्थितीत केला होता. न्यायालयाच्या या ताशेऱ्यांनंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये आणखी ८ जणांना अटक केली आहे. यात एक पोलिस कर्मचारी, एक होमगार्ड, लॉज चालक असलेले एक माजी नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी दिली.