फैजपूरात सट्टा आणि पत्त्यांच्या क्लबांचा हैदोस; पोलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ आशीर्वादाने शहराचे ‘गोवा’ करण्याचा प्रयत्न!
फैजपूर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | फैजपूर शहरात सध्या कायद्याचे राज्य नसून जुगारी आणि सट्टा बहाद्दरांचे ‘नंदनवन’ फुलले आहे. एका बाजूला सट्टा-मटक्याचा सुळसुळाट आणि दुसऱ्या बाजूला अलिशान घरांमध्ये अन् पडक्या वाड्यांमध्ये चालणारे हायप्रोफाईल ‘पत्यांचे क्लब’ यामुळे फैजपूर शहराची शांतता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे, ज्या पोलिसांवर हे अवैध धंदे रोखण्याची जबाबदारी आहे, तेच पोलीस या धंद्यांच्या संरक्षणासाठी ‘ढाल’ बनून उभे आहेत की काय? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.सावदा शहर व परिसरातील अवैध धंदे बंद असल्याने फैजपूर शहरातील अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
दिवसा सट्टा, रात्री पत्त्यांचा ‘महफिल’!
शहरात सकाळपासूनच मटक्याचे आकडे लावण्यासाठी गर्दी जमते, तर दुपारनंतर ठराविक ठिकाणी पत्त्यांचे (जुगार) डाव रंगू लागतात. काही खासगी बंगले, फार्महाऊस आणि शहराच्या मध्यवस्तीतील गल्लीबोळांमध्ये लाखो रुपयांची हार-जीत उघडपणे सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पत्त्यांच्या क्लबवर बाहेरगावचे पांढरपेशी लोकही गाड्या घेऊन येतात. या गाड्यांचा ताफा पोलिसांना दिसत नाही का? की ‘हप्त्याची’ गाडी पोलीस ठाण्यापर्यंत वेळेवर पोहोचते म्हणून खाकीने डोळ्यावर पट्टी बांधली आहे?
‘दलाली’ की ‘हप्तेखोरी’?
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीद विसरून फैजपूर पोलीस सध्या केवळ मटका आणि जुगार अड्ड्यांचे वसुली एजंट बनले आहेत, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. शहरात कुठे जुगार सुरू आहे आणि कुठे सट्टा, याची इत्यंभूत माहिती पोलिसांकडे असते. मात्र, कारवाईचे नाटक करून केवळ पडीक जागी बसलेल्या दोन-चार गरिबांना पकडले जाते आणि जिथे लाखांच्या उलाढाली होतात, त्या ‘व्हीआयपी’ क्लबकडे पोलीस ढुंकूनही पाहत नाहीत. हे सर्व पोलिसांच्या संमतीशिवाय शक्य आहे का?
‘अर्थपूर्ण’ मौनाचे रहस्य काय?
तरुणाई बरबाद, गुन्हेगारीला फुटले धुमारे!
सट्टा आणि जुगाराच्या या व्यसनामुळे फैजपूरमधील तरुणाई पूर्णपणे भरकटली आहे. कष्टाचा पैसा या जुगारात गमावल्यानंतर तरुण चोरी, लुटमार आणि वादावादीकडे वळत आहेत. जुगाराच्या अड्ड्यांवरून होणाऱ्या भांडणांमुळे शहरात कोणत्याही क्षणी मोठी कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, पोलीस प्रशासन केवळ ‘टक्केवारी’ आणि ‘महिन्याकाठी’ मिळणाऱ्या रकमेत मग्न आहे.
आता जनतेचा ‘थेट प्रहार’!
“पोलीस प्रशासन जर या सट्टा आणि पत्त्यांच्या क्लबांवर बुलडोझर चालवू शकत नसेल, तर त्यांनी आम्हाला सांगावे. आम्ही जनता म्हणून हे अड्डे उद्ध्वस्त करू. पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा नंगानाच आम्ही आता खपवून घेणार नाही. जिल्हा अधीक्षकांनी तात्काळ येथील भ्रष्ट अधिकाऱ्यांची उचलबांगडी करावी!”
— फैजपूरमधील संतप्त नागरिक.


