भरदुपारी ९० वर्षीय वृद्ध महिलेची हत्या, अवैध धंदे बोकाळल्याने ग्रामस्थांचा रास्ता रोको करून असंतोष व्यक्त
जामनेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जामनेर तालुक्यातील वाकडी येथे एका ९० वर्षीय वृद्ध महिलेची हत्या भरदुपारी करण्यात आल्याची घटना दि. ११ मे रोजी दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान घडली आहे. ही हत्या वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिन्यांसाठी करण्यात आल्याचा प्राथमिक संशय असून ग्रामस्थांनी मात्र आज रविवारी दि. १२ मे रोजी सकाळी रास्ता रोको करून असंतोष व्यक्त केला. गावात व परिसरात मोठ्या प्रमाणावर सर्रास अवैध धंदे सुरू आहेत. सट्टा,जुगार,दारू या साठी व्यसनी लोकांना पैशांची गरज असते.पैशांसाठी ते चोरी करतात असं गावातील व परिसरातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
राधाबाई भालचंद्र परदेशी,वय वर्ष ९०, रा. वाकडी ता. जामनेर. या वृद्ध महिला गावात एकट्याच राहत होत्या. तर काही अंतरावर त्यांचा मुलगा सुभाष भालचंद्र परदेशी वय ६५ वर्ष. हे परिवारासह राहतात. दोन मुलींची लग्न झालेली असून शनिवारी सकाळी मुलगा सुभाष यांच्या घरून त्या ११ ते सव्वा ११ वाजेच्या सुमारास निघून त्यांच्या घरी गेल्या होत्या. नंतर दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान त्यांचा अज्ञात मारेकऱ्याने हत्या केला. गावातील एक मुलगी राधाबाईंच्या घराजवळ आली असता तिला दरवाजा उघडा दिसला. तिने आत जाऊन पहिले असता हा प्रकार उघड झाला. मयत महिलेच्या चेहऱ्यावर जखमा होत्या व कानातील सोने ओरबाडून काढलेले दिसत होते. यानंतर पोलिसांनी सदर मृतदेह हा जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नेला.
दरम्यान, रविवारी दि. १२ ला शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पहूर, फत्तेपूर पोलिस स्टेशन आणि एलसीबीचे पथक संयुक्तपणे तपास करीत असून संशयित मारेकऱ्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, रविवारी ग्रामस्थांनी रास्ता रोको करून असंतोष व्यक्त केला. गावात अवैध धंदे बोकाळले असल्यामुळे ग्रामस्थांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे हे धंदे बंद करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.यावेळी अप्पर एसपी कविता नेरकर, डीवायएसपी धनंजय येरुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. ग्रामस्थांना, अवैध धंदे बंद करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. पुढील तपास फत्तेपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश फड करीत आहेत.