सपोनि शरद पवार ला दोन लाखांची लाच घेताना त्यांच्याच पोलिसस्थानकात ठोकल्या बेड्या
भिवंडी, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दोन लाखांची लाच स्वीकारताना भिवंडी मधील नारपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना रंगेहाथ पकडले आहे.
भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बबन पवार वय ३८ वर्ष यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना नारपोली पोलीस ठाण्यातच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या १६ वर्षांचा योगेश रवी शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे ७ डिसेंबर रोजी उघड झाले होते. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दाखल केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आयुश विरेंद्र झा, मनोज नारायण टोपे, अनिकेत तुकाराम खरात, शिवाजी धनराज माने, संतोष सत्यनारायण ताटीपामुल या आरोपींना अटक करून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार हे करीत होते.
आरोपी अनिकेत खरात याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी पैसे द्यावे लागतील नाहीतर कुटुंबीयांना या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार याने अनिकेतच्या आई कडे ५ लाखांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड होऊन अनिकेतच्या आईने २ लाख देण्याचे कबूल केले. त्यानंतर खरात कुटुंबीयांनी याबद्दलची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी केलेल्या कारवाईत शरद पवार यांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.