भुसावळ पुन्हा खूनाने हादरले : तरुणाची गळा चिरून हत्या
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : भुसावळ शहरातील खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात अमृतसरच्या तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी मयताच्या चार मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मनमीतसिंग गुरूप्रीत सिंग (वय १९, रा. अमृतसर, पंजाब) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मनमीतसिंग आपल्या पाच मित्रांसह बुधवार, २६ रोजी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसने अमृतसरकडे निघाला होता मात्र डी – २ डब्यात पाच तरुणांचा एका प्रवाशाशी वाद झाल्यानंतर त्यांनी संबंधितास मारहाण केली मात्र संबंधिताने सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधल्यानंतर पाचही तरुण खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उतरले व गुरुवारी सकाळच्या सुमारास मनमीतसिंगचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र, मृत व्यक्तीचे हात, पाय, खांदा हे फ्रॅक्चर झाल्याचे तसेच गळा सुध्दा चिरल्याचे आढळून आले. नंतर मयताच्या भावाने फिर्याद दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोबतच्या चारही मित्रांनीच हा खून केल्याचा संशय आहे.
याबाबत मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार चारही संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीजवळ डेबीट कार्ड होते. ते कार्ड पंजाब अॅण्ड सिंद या बॅकेचे होते, त्या कार्डावरून पोलिसांनी औरंगाबाद येथे त्या बँकेत चौकशी करून त्या कार्डावरून मृतदेहाची ओळख पटविली. पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शखाली पोलिस तपास करीत आहे.