भाजपा नगरसेविका अपात्रता निर्णयास नगरविकास विभागाकडून स्थगिती !
भुसावळ (प्रतिनिधी)। भुसावळ नगरपालिकेच्या २०१६ मधील सार्वत्रिक निवडणुकीत अनिता एकनाथ सोनवणे यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी अपात्रतेला नगरविकास विभागाने १४ ऑगस्टला स्थगिती दिली आहे.
सौ.सोनवणे यांनी नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम ९ (अ) च्या तरतुदीनुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे अपील दाखल केली होती. या अपीलावर नगरविकास विभागाने १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्यांच्या निर्णयावरती पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगिती दिल्याने नगरसेविका सौ.सोनवणें व भाजपच्या गटाला दिलासा मिळाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांच्या तक्रारिवरून भुसावळ नगरपालिकेच्या २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनूसूचित जमाती महिला राखीव जागेवरुन प्रभाग क्रमांक ७ अ मधून विजयी झालेल्या सौ.अनिता सोनवणे यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकार्यांकडुन त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. तक्रारदार केदारनाथ सानप यांनी या प्रकरणी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती दिली आहे.