भाजपमध्येच राहणार ; देशाच्या सुरक्षेसमोर खुर्ची मोठी नाही– आ. संजय सावकारे ठाम !
भुसावळ, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा : येथिल आ. संजय सावकारे हे भाजपाला सोडचिठ्ठी देत एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असल्याने ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा चर्चाना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी आपण भाजप सोडणार नसल्याचे सांगत आपल्या आगामी वाटचालीबाबत पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली आहे.
गेल्या दोन टर्म भाजपच्या तिकिटावर निवडून येणारे भुसावळ मतदारसंघाचे आ. संजय सावकारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जवळचे मानले जातात खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशादरम्यान आ. सावकारे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते मात्र, त्यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ते आगामी विधानसभा निवडणुकीत ऐनवेळेस स्वगृही परतत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा नेहमी रंगतांना पाहायला मिळते. यावर आ. सावकारेंनी आधीही भाजपमध्येच राहणार असल्याचे सांगितले होते.
याबाबत आ. संजय सावकारेंनी यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. ते म्हणाले, आज देशाच्या सुरक्षेसाठी भाजपची आवश्यकता आहे. मला आताही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून ऑफर्स येत आहेत. पण मी आता भाजप सोडणार नाही. देशाच्या सुरक्षेसमोर पद, खुर्ची मोठी नाही. एकवेळ उमेदवारी नाही भेटली तरीही चालेल पण भाजप सोडणार नाही. कारण देशाच्या सुरक्षेसाठी भाजप शिवाय पर्याय नाही, अशी ठाम भूमिका आमदार संजय सावकारे पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. ते भुसावळ येथील विकासकामांचे शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.