आतांची मोठी बातमी : साकेगावात २० हजाराच्या बनावट नोटा, जळगाव जिल्ह्यात खळबळ
भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भुसावल तालुक्यातील साकेगाव या गावी १०० आणि २०० रुपये मूल्याच्या एकूण २० हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शन्नो नामक ३५ वर्षीय महिला आणि जामनेर तालुक्यातील पहूर येथून हनिफ पटेल ,वय ५५ वर्ष या दोघांना ताब्यात घेतले.
भुसावल-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील भुसावल पासून जवळच असलेल्या साकेगाव येथे ४० हजार रुपयांचे खरे चलन दिल्यावर त्या बदल्यात १ लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळत असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने गेल्या आठवड्यापासून माहितीची खातरजमा सुरू केली. त्यात साकेगाव येथील एक महिला नोटांची देवाणघेवाण करत असल्याचे समोर आले. त्यानुसार डमी ग्राहकाजवळ ३ हजार रुपये देण्यात आले. त्या बदल्यास त्यास १५ हजारांच्या बनावट नोटा मिळाल्या. पडताळणीत या सर्व नोटांवरील क्रमांक एकसारखा असल्याचे दिसले. विशेष म्हणजे या नोटा भारतीय चलनातील नोटांप्रमाणेच अस्सल दिसत होत्या.
डीवायएसपी वाघचौरे, भुसावळ तालुक्याचे पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी गुरुवारी गोपनीय पद्धतीने साकेगावमधून शन्नो, वय ३५ वर्ष, नावाच्या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्या घरातून पोलिसांनी २० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. शन्नोने दिलेल्या माहितीवरून पहूर येथून हनिफ पटेल,वय ५५ वर्ष .याला ताब्यात घेतले. दोघांना तालुका पोलिस ठाण्यात आणून चौकशी केली. पहूर व परिसरात हनिफसोबत अजून कोणी सहकारी आहे का ? याचा शोध सुरू आहे. बनावट नोटांचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांची तीन पथके जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चौकशीसाठी रवाना झाले आहेत. त्यात प्रामुख्याने बनावट नोटांची छपाई कुठे होत होती? यात आणखी कोणी सामील आहेत काय? पोलीस या बाबत तपास करत आहे.