मोठी बातमी ; भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांचे निलंबन
भुसावळ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। भुसावल प्रांताधिकारी
रामसिंग सुलाणे यांचेवर अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात याबाबतची घोषणा केली.
अधिकाराचा वापर करीत भ्रष्टाचाराचा आरोप मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भुसावळ प्रांताधिकार्यांच्या कार्यद्धत्तीविषयी आक्षेप घेत तक्रारी नोंदवल्या होत्या. शिवाय बोदवड येथील गौण खनिज प्रकरणाबाबत लक्ष वेधण्यात आले होते. मूळात शेती प्रयोजनासाठी जागा असताना तेथे गौण खनिजाची उत्खननाला परवानगी देण्यात आली. तसेच त्यानंतर तेथेच दंडात्मक कारवाई करण्यात आली व नंतर पुन्हा उत्खनन केल्यानंतर दंडाला स्टे देण्यात आल्याचा अजब प्रकार प्रांताधिकार्यांनी आपल्या अधिकारात अधिकार नसताना बेकायदा केल्याचा आरोप आहे.
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनीदेखील वेल्हाळे येथील आदिवासी जमिनीचे हस्तांतरणाचे अधिकार नसताना प्रांताधिकार्यांनी अधिकाराचे उल्लंघण केल्याची तक्रार केली होती. या शिवाय भुसावळातील मेझॉनिक लॉज कुळ कायद्यात बसत नसताना हस्तांतरणाची परवानगी प्रांताधिकार्यांनी दिल्याचा दावा देखील सभागृहात केला. या संदर्भात आमदार संजय सावकारे म्हणाले की, भुसावळातील प्रांताधिकार्यांनी अनेक निर्णय बेकायदा घेतले असून ज्या बाबींचा त्यांना अधिकार नाही त्याबाबतही त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. भुसावळातील पारशी समाजाच्या जागेचा हस्तांतरणाचा प्रयत्न सुरू असून त्याबाब ज्यांनी कुणी व्यवहार केला असल्यास सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. या जागेतही गैरप्रकार होण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे. प्रांताधिकारी सुलाणे यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याची माहिती आमदारांनी दिली.