लग्नापूर्वी हुंड्यासाठी छळ; तरुणीने केली आत्महत्या
भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील एक उच्चशिक्षित तरुणीचा दोन आठवड्यांपूर्वीच साखरपुडा झाला होता होणाऱ्या पतीसह सासूने गावंढळ आहे असे म्हणून हिणवले. लग्नात थाटमाट करण्यासाठी आग्रह केला. सोने, रोख रक्कम घेऊन येण्याची मागणी केली. हा त्रास असह्य झाल्याने अखेर या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत सविस्तर असे, रामेश्वरी रवींद्र नागपुरे (बारी, वय २४, रा. कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ) असे मृत तरुणीचे नाव आहे. रामेश्वरीचे एमएपर्यंत शिक्षण झाले होते. तिचे चुलत भाऊ जीवन बारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा रावेर येथील भूषण ज्ञानेश्वर पाटील (बारी) या तरुणाशी रामेश्वरीचे लग्न ठरले होते. भूषण नाशिकमध्ये राहत असून, वैद्यकीय प्रतिनिधीचे काम करतो. िववाहानिमित्ताने सहा मार्च रोजी कुऱ्हे पानाचे गावात साखरपुडा झाला. त्याच्या आईने रवींद्र नागपुरे यांच्याकडून २५ हजार रुपये रोख घेतले. हुंड्यात तीन तोळ सोन्याचे दागिने व ५० हजार रुपये रोख द्यायची मागणी केली. ही मागणी नागपुरे यांनी मान्य केली होती. यानंतर भूषणने रामेश्वरीला फोन करून वारंवार पैशांची मागणी केली.
चार दिवसांपूर्वी त्याने नागपुरे यांना रावेर शहरात बोलावून घेत त्यांच्याकडून हुंड्याची रक्कम व दागिने घेतले. मुलीच्या संसारासाठी नागपुरे यांनी दागिने व रोख रक्कम दिली हाेती. पैसे मिळाल्यानंतरही भूषणची हाव कमी झाली नाही. त्याने पुन्हा रामेश्वरीला फोन करून लग्न थाटात लावून देण्याची मागणी केली. लग्नात बग्गी पाहिजे, मोठ्या लॉनमध्ये लग्न करावे, स्टेजवर एसी हवा, मंडपात कुलर हवे अशा मागण्या भूषण व त्याची अाई करीत होती. ही बाब रामेश्वरीने वडिलांना सांगितली होती. या वेळी त्यांनी भूषणच्या आईस फोनवरून विचारणा केली असता त्यांनीही मुलाने सांगितलेल्या अटी कायम ठेवल्या होत्या.
त्यानुसार नागपुरे नियोजनात व्यग्र झाले होते. काही दिवसांनी भूषणने रामेश्वरीला फोन करून ‘तू गावंढळ आहेस, मला पसंत नाही, मी हे लग्न मोडणार आहे’ असे बोलून हिणवले. त्याचे मन राखण्यासाठी रामेश्वरीने जिम लावली होती. जिममध्ये जाऊन वजन कमी करणार असल्याचे तिने भूषणला सांगितले. जिममध्ये व्यायाम करीत असल्याचे काही फोटो तिने व्हाॅट्स अॅपवरून भूषणला पाठवले होते. तरीही ‘आता त्याचा काही उपयोग होणार नाही, मी लग्न मोडणार आहे’ असा रिप्लाय भूषणने दिला हाेता. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी माहेरच्या लोकांनी पोलिसांकडे केली आहे.
नातेवाइकांनी २२ तासांनंतर रुग्णालयातून मृतदेह घेतला ताब्यात
रामेश्वरीला छळणाऱ्या भूषण व त्याच्या आई विरुद्ध गुन्हा दाखल करावा, तेव्हा मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. शनिवारी सकाळपासून हे लोक तालुका पोलिस ठाण्यात बसून होते. पोलिसांनी जबाब घेऊन चौकशी करू. दोषींवर गुन्हा दाखल करू, असे आश्वासन दिले. यानंंतर दुपारी २ वाजता मृतदेह ताब्यात घेतला.