अंतर्नादचा एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजाला दिशा देणारा– रोटरी मा.अध्यक्ष सुधाकर सनांसे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
भुसावळ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। शहरात सालाबाद प्रमाणे अंतर्नाद प्रतिष्ठानने गणरायाला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम राबविला.यंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष होते.चार शाळेतील १७५ विद्यार्थ्यांना मदतीचा हात या उपक्रमातून देण्यात आला.गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करुन दात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या मदतीतुन गोरगरीब विद्दार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.त्यात बालमित्र पुस्तक,पाटी,पेंसील,वह्या,पेन,रंगपेटी,पट्टी,खोडरबर समावेश आहे.
निरंतर चार शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा समारोप जिल्हा परिषद शाळा भालशिव तालुका यावल येथील शाळेत करण्यात आला.उपक्रमाची सुरुवात भुसावळ तालुक्यातील सुसरी जिप शाळा येथून झाली,त्यात नंतर पिंपळगाव खुर्द जिप शाळा, यावल तालुक्यातील जिल्हा परिषदेची टाकरखेडा या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि संत गाडगेबाबा यांनी दाखवलेल्या मार्गाने अंतर्नाद वाटचाल सुरु आहे.भविष्यात ह्या शैक्षणिक चळवळीला व्यापक स्वरुप यावे अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.टाकरखेडा येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुले हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर सनांसे, उपसरपंच अनिल महाजन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद महाजन, संतोष चौधरी, मुख्याध्यापक प्रकाश बऱ्हाटे हे होते.भालशिव येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष रोटरीचे माजी अध्यक्ष सुधाकर सनांसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वर्षा कोळी, उपसरपंच निलेश कोळी, ज्ञानेश्वर घुले, पोलीस पाटील सचिन कोळी, मुख्याध्यापक राजेंद्र कोल्हे हे होते.सूत्रसंचालन उषा सायन्स सेंटरचे चेअरमन जीवन महाजन यांनी केले.प्रस्तावित प्रकल्प समन्वयक अमितकुमार पाटील यांनी तर अंतर्नादच्या उपक्रमाविषयी प्रकल्प प्रमुख भूषण झोपे यांनी माहिती दिली.आभार सह समन्वयक विक्रांत चौधरी यांनी मानले.या प्रसंगी माजी गस संचालक योगेश इंगळे,नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक प्रदीप सोनवणे,कुंदन वायकोळे, प्रा.श्याम दुसाने,मनोज सुरवाडे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दातृत्वाच्या दिंडीचे वारकरी
उपक्रमास रघुनाथ सोनवणे, प्रा.भाग्यश्री भंगाळे,नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढी सभापती ज्योती साठे, निलिमा निकम,विनोद अग्रवाल, निलेश वारके, आनंदा पाटील, भूषण कोटेचा, ललित फिरके,विनोद जैन, विनायक खडसे, जयश्री शेलार यांनी सहकार्य केले.
दात्यांची संख्या वाढावी
सण उत्सवाना सामाजीक उपक्रमांची जोड देउन राबविण्यात आलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आणि समाजाला दिशा देणारा असाच आहे.दात्यांच्या मदतीच्या माध्यमातून गरीब गरजवंत विध्यार्थी यांची शैक्षणिक साहित्याची गरज भागत आहे.दात्यांनी अश्या उपक्रमाना भरभरून मदत केली पाहिजे असे रोटरीचे माजी अध्यक्ष सुधाकर सनांसे म्हणाले.
लाेकचळवळीचे स्वरुप यावे
अंतर्नादने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात समाजातील जास्तीत जास्त घटकांनी सहभागी हाेऊन लाेकचळवळीचे स्वरुप देणे अपेक्षित आहे. उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असे उपक्रम निश्चितच पुरक ठरतील असे सामाजीक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुले यांनी नमूद केले.
भविष्यात व्यापक स्वरूप
एक दुर्वाच्या माध्यमातून गरिब आणि गरजवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागविता आली याचे फार मोठे समाधान आहे.भविष्यात गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाला अजुन व्यापक स्वरुप देउ असे अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी नमूद केले.