फेकरी रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात,एकाचा मृत्यू तर दोन मालवाहू गाड्यांचा चक्काचूर
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी । भुसावल जवळील फेकरी येथील रेल्वे उड्डाणपूलाजवळ दोन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना आज दिनांक १३ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फेकरी गावचे पोलीस पाटील किशोर बोरोले हे नेहमीप्रमाणे हायवे रोड कडे पहाटे फिरण्यासाठी जात असताना त्यावेळी अपघात झाल्याची खबर त्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फेकरी शिवारातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ नॅशनल हायवे क्रमांक ५३ वर दोन वाहनांचा अपघात होऊन त्यात मालवाहू वाहनाजवळ एक वाहन चालक रोडवर जखमी अवस्थेत पडलेला होता व त्याच्या डोक्याला जबर मार लागून कानातून रक्त वाहत होते. तसेच सदर हायवे रोडवर एक माल ट्रक क्र.जी.जे.०३-बी.टी.-५७२८ हे वाहन हायवे रोडवर अपघातात पलटी झालेले होते. सदर ट्रक मधील माल स्टाईल्स हे रोडावर अस्ताव्यस्त पडलेले होते. माल ट्रकच्या थोड्या अंतरावर एक अपघातग्रस्त मालवाहतूक वाहन क्रमांक एम.एच.२८ ए. बी. -४३३४ या वाहनाच्या पुढील कॅबिन पूर्णपणे चक्काचूर होऊन मास्यांनी भरलेले ट्रे हे रोडवर अस्ताव्यस्त पडले होते. प्रसंगी पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला व हायवे मोबाईल व्हॅनला फोन केला. थोड्यावेळाने पोलिसांची गाडी व हायवे ची मोबाईल व्हॅन घटनास्थळी आली व अपघातातील जखमींना जळगाव येथील सिविल दवाखान्यात रवाना करण्यात आले.
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर ट्रक क्र.जी.जे. ०३-बी.टी-५७२८ यावरील अज्ञात चालक याने त्याच्या ताब्यातील मालट्रक हा भुसावळ कडून वरणगाव कडे भरधाव वेगाने येत असताना समोरून वरणगाव कडून भुसावळ कडे येणारे मालवाहतूक व्हॅन क्रमांक एम.एच.२८ ए.बी.४३३४ या वाहनास समोरून जबरदस्त धडक दिल्याने वाहनावरील चालक रोडवर फेकला जाऊन त्याच्या डोक्यात जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला. याबाबत परिसरात वार्ता पसरताच घटनास्थळी जखमींचे नातेवाईक आले असता घटनास्थळी जखमीचे वडील अरुण सुखदेव मानेकर यांच्याकडून समजले की, अपघातातील मयत शिवचरण अरुण मानेकर (वय २८ वर्ष,रा.पहूरपुर्णी जिल्हा बुलढाणा) यांना सिव्हील हॉस्पीटल जळगाव येथे उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.
मालट्रक चालक भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने सदर अपघात घडला असून यामुळे मानेकर यांचा मृत्यू झाला. दोन्ही वाहनांचे व वाहनांमधील मालाचे नुकसानीस हा ट्रक चालक कारणीभूत असून अपघातग्रस्तांना मदत न करता तो तेथून पसार झाला असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मयताचे वडील व नातेवाईकांनी मागणी केली आहे.