मोठी बातमी ; बोगस शालार्थ आयडी घोटाळा… जळगाव जिल्ह्यातील १० शिक्षण संस्थांमधील मुख्याध्यापकांची चौकशी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच जणांच्या पथकाने तब्बल ६ तास चौकशी करण्यात आली. याच प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील १० शिक्षण संस्थांमधील शाळेतील मुख्याध्यापकांना बोलाऊन त्यांची संध्याकाळ पर्यंत कसून चौकशी करण्यात आली आहे.
बोगस शालार्थ आयडी तयार करून बोगस शिक्षकांची भरती करण्यात आली. या शालार्थ घोटाळ्याचा संशय असलेल्या जळगाव जिल्ह्यातील संबंधित १० शिक्षण संस्थांमधील शाळांच्या मुख्याध्यापकांना शालार्थ प्रणाली, कायम मान्यता आदेश, शाळा मान्यतेची कागदपत्रे यासंबंधी चौकशी करण्यासाठी नुकतेच नाशिक येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्या प्रक्रियेनंतर सोमवारी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक थेट जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात दाखल झाले. या वेळी त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद जळगाव यांच्या कार्यालयात संबंधित १० मुख्याध्यापकांकडून आवश्यक ती सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. शिक्षण संस्थांमध्ये बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षकांची बोगस भरती करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने संबंधित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शाळांच्या पदाधिकाऱ्यांवरही फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आधी पडताळणी न करता परस्पर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती केल्याच्या प्रकरणात ६८ शिक्षकांची लातूर येथील एसएससी बोर्डाच्या अध्यक्षांसमोर नुकतीच सुनावणी झाली.
सन २०१२ पासून राज्यात शिक्षक भरतीवर बंदी असतानाही जळगाव जिल्ह्यात काही शैक्षणिक संस्थांचे चालक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांनी संगनमताने शालार्थ आयडी घोटाळा करून बेकायदेशीर शिक्षक भरती केली. असा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी संशयितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदनही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले आहे.


