मोठी बातमी : “जात प्रवर्ग” चा निर्णय अखेर रद्द, शिक्षण मंडळाकडून दिलगिरी व्यक्त
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षांवरून एका नव्या वादाला तोंड फुटलं. परीक्षेसाठीच्या हॉल तिकीटांवर जातीच्या प्रवर्गाचा (कास्ट कॅटेगरी) उल्लेख करण्याचा निर्णय करण्यात आला. १२ वीच्या विद्यार्थ्यांना अशा हॉलतिकिटचं वाटपही झालं. पण, टीकेनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलगिरी व्यक्त करत हा निर्णय रद्द केला आहे.
राज्यात ११ फेब्रुवारीपासून बारावीची(एचएससी) तर २१ फेब्रुवारीपासून दहावी (एसएससी) बोर्डाची परीक्षा सुरू होत आहे. हॉल तिकीटांवर यंदा विद्यार्थ्यांची जन्मतारीख आणि जात प्रवर्ग (कास्ट कॅटेगरी) या दोन रकान्यांचा नव्याने समावेश करण्यात आला.बयातील जात प्रवर्ग च्या रकान्यात संबंधित विद्यार्थ्याच्या जातप्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला.
परीक्षा मंडळाकडून अशाप्रकारे हॉल तिकिटावर विद्यार्थ्याच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
महाराष्टात आधीच जात आणि आरक्षण या मुद्यावरून वातावरण खराब झालेलं असताना असा निर्णय घेण्यापूर्वी बोर्डाने विचार करायला हवा होता, तसेच विद्यार्थ्याची ओळख इतकी गोपनीय ठेवली जात असताना जातप्रवर्गाचा उल्लेख कशासाठी? संबंधित वर्गातील पर्यवेक्षकास विद्यार्थ्यांची जात समजल्यास परीक्षेदरम्यान भेदभाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.” अशा प्रकारे अनेकांनी यावर टीका केली.
या विरोधानंतर शिक्षण मंडळाने हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. तसेच नव्याने हॉल तिकीट जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना २३ जानेवारी २०२५ पासून हे नवे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना २० जानेवारी २०२५ रोजीच्या दुपारी तीन वाजेपासून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येईल.
या बाबत मंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. काय म्हटलंय मंडळाने परिपत्रकात?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळाचे प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुकवार दिनांक १०/०१/२०२५ रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
या संदर्भात कळविण्यात येते की, १) मंडळाने उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्रांवर (Hall Ticket) जातीचा प्रवर्ग (Caste Category) या कॉलमची छपाई करण्यात आलेली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळ दिलगिरी व्यक्त करीत आहे. प्रवेशपत्रांवरील (Hall Ticket) सदरचा जातीचा प्रवर्ग (Caste Category) कॉलम रद्द करण्यात येत असून विद्याथ्यांची परीक्षेविषयक इतर माहिती आहे तशीच राहील याची नोंद घ्यावी. सदरची नव्याने तयार केलेली प्रवेशपत्रे (Hall Ticket) गुरूवार दिनांक २३/०१/२०२५ पासून Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलव्ध करून देण्यात येत आहेत.
२) तसेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्याथ्यांच्या प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) जातीचा प्रवर्ग (Caste Category) हा कॉलम रद्द करण्यात येत असून सदरची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (online) पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर सोमवार दिनाक २०/०१/२०२५ रोजी दुपारी ०३.०० वाजेपासून Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच download संदर्भातील उर्वरित इतर सूचना व विद्यार्थ्यांची परीक्षाविषयक माहिती आहे तशीच कायम राहील, यात कोणताही बदल होणार नाही याची सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी उपरोक्त बाबींची नोंद घ्यावी.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा