मोठी बातमी : दहावी – बारावी परीक्षा केंद्रावर प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही..
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दहावी व बारावीच्या परीक्षा संदेभात एक मोठी बातमी समोर आली आहे. शिक्षण मंडळाकडून मोठं पाऊल उचलण्यात आल आहे. दहावी – बारावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रांवर प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून काढण्यात आले आहेत. शिक्षण मंडळाचा निर्णय कितीही योग्य असला तरी सीसीटीव्ही साठीचा लागणारा खर्च कोणी करायचा यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे.
राज्यात होऊ घातलेल्या दहावी तसेच बारावीच्या परीक्षेदरम्यान प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्ग खोली मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश मंडळाने काढले आहेत. इतकंच नाही तर वीजपुरवठा खंडित झाल्यास सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडू नये यासाठी इन्वर्टर किंवा जनरेटरची व्यवस्था करावी लागणार आहे. सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झालेले चित्रीकरण विशिष्ट कालावधीसाठी जपून ठेवावं लागणार आहे. आदेशाच्या अंमलबजावणीबाबत शाळांचे मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुखांकडून हमीपत्र घेण्यात येत आहे. कॉपीमुक्त तसेच भयमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळानं हे पाऊल उचललं आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते.
मात्र राज्यामध्ये दहावीची सुमारे ५००० तर बारावीची सुमारे ३००० परीक्षा केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर किमान १० सीसीटीव्ही बसवावे लागणार आहेत. एका सीसीटीव्हीसाठी साधारणपणे २० ते २२ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांना सीसीटीव्ही यंत्रणेवर लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. हा खर्च कोणी करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या मुळे शिक्षकांच्या डोक्याचा ताप मात्र वाढला आहे. शिक्षण मंडळाचा निर्णय योग्य आहे. मात्र सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी लागणारा आवश्यक निधी शिक्षण मंडळानं उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शाळांकडून होत आहे. या विषयात शासनाने लक्ष घालून मध्यममार्गी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.