मोठी बातमी : धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश,आज देणार राजीनामा!
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सोशल मीडियावर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे धक्कादायक फोटो व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देवगिरी बंगल्यावर सोमवारी ३ मार्च रोजी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करतील, अशी शक्यता आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. या प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल, अशी भूमिका घेतली होती. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे भाग पडल्याची चर्चा आहे. मात्र आता धनंजय मुंडे केव्हा राजीनामा देतात हे लवकरच समोर येणार.