वीज ग्राहकांसाठी मोठी बातमी : विजेचे दर कमी होणार
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l महावितरणकडून देण्यात येणाऱ्या विजेच्या अवाजवी बिलांमुळे ग्राहक त्रस्त झालेले असताना वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
राज्यातील जास्त प्रमाणात विजेचा वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांचे वीज दर हे युनिटमागे दीड ते दोन रुपयांनी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच त्याच बरोबर व्यावसायिक तसेच औद्योगिक श्रेत्रातील विजेचे दर सुद्धा युनिटमागे दीड ते दोन रुपयांनी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.
राज्यात उन्हाळ्यात विजेची मागणी दरवर्षी वाढतच असून, यंदा ती २९ हजार मेगावॉटपर्यंत पोहोचली होती. सन २०३० पर्यंत विजेची मागणी सुमारे ४५ हजार मेगावॉटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महावितरणने सौर, पवन ऊर्जा, जलविद्युत प्रकल्प तसेच औष्णिक विद्युत प्रकल्पांमधून सुमारे ३५ हजार मेगावॉट वीज निर्मितीचे नियोजन केले आहे, अशीही माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.
त्याच बरोबर कृषी पंपांची दीड ते दोन रुपयांची क्रॉस सबसिडी कमी केली जाईल. असेही सांगितले गेले. राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित झाल्यावर कृषी पंपांसाठी दिली जाणारी दीड ते दोन रुपयांची क्रॉस सबसिडी कमी होईल. यामुळे व्यावसायिक, औद्योगिक आणि उच्च वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीज दर प्रति युनिट सुमारे दीड ते दोन रुपयांनी कमी होतील. राज्यातील वीज दरातील ही घट व्यावसायिकांसाठी आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरेल. सध्या कृषी पंपासाठी शासनाकडून काही क्रॉस सबसिडी दिली जाते. इतर भार व्यावसायिक, औद्योगिक आणि जास्त वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांवर टाकला जातो. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या ९ हजार २०० मेगावॉट प्रकल्पावर सध्या काम सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरातील पहिला प्रकल्प कार्यान्वित झाला आहे, असेही लोकेश चंद्र यांनी सांगितले.