महाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

मोठा बातमी : मुक्ताईनगर बाजार समिती नव्याने स्वतंत्रपणे स्थापनेचा शासन निर्णय,बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन

आ.चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज अक्षय काठोके | मुक्ताईनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाची दीर्घकाळ प्रलंबित मागणी अखेर मान्य झाली असून, या निर्णयामुळे आता मुक्ताईनगर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समितीची स्थापना होणार आहे. आ. चंद्रकांत पाटील यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत राज्य शासनाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

शेतमालाच्या बाजारपेठेत वाढणारी अडचण अखेर मिटणार
मुक्ताईनगर मतदारसंघात बोदवड, मुक्ताईनगर व रावेर हे तीन तालुके असून, यासोबतच भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरही बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात होता. त्यामुळे कार्यक्षेत्र खूपच मोठे झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीस नेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. वाहतूक खर्च, वेळेचा अपव्यय आणि बाजारात शेतमाल साठवण्याच्या अडचणी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते.

आ. चंद्रकांत पाटलांचा नियोजनबद्ध पाठपुरावा
शेतकऱ्यांच्या या व्यथेला जाणून आ. चंद्रकांत पाटील यांनी बाजार समितीच्या त्रिभाजनाची मागणी केली होती. त्यांनी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार केला. प्रशासनिक पातळीवर चर्चा घडवून आणत या विषयाला प्राधान्य दिले. अखेर १७ एप्रिल २०२५ रोजी शासन निर्णय क्रमांक कृबास २०२५/प्र.क्र.३१/११-स अन्वये यास मान्यता देण्यात आली.

मुक्ताईनगरमध्ये स्वतंत्र बाजार समितीची स्थापना
या निर्णयानुसार राज्यातील ६५ तालुक्यांमध्ये बाजार समित्यांचे विभाजन झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, मुक्ताईनगर आणि भडगाव या तालुक्यांमध्येही विभाजन करण्यात आले असून, मुक्ताईनगरसाठी स्वतंत्र बाजार समितीची स्थापना होणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आता त्यांच्या जवळच शेतमाल विक्रीची सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. एकीकडे बाजारपेठ जवळ येणार, तिथेच साठवणूक व विक्रीच्या सुविधा मिळणार, आणि दुसरीकडे वेळेची व पैशांची बचत होणार असल्याने सर्व स्तरांवरून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

“हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या संघर्षाचे आणि आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ आहे. यामुळे मुक्ताईनगर तालुक्याच्या शेतीला नवे बळ मिळणार आहे,” असे प्रतिपादन आ. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!