मोठी बातमी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळणार?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l मध्यप्रदेश च्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिला आर्थिक सक्षम बनविण्यासाठी जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेनुसार २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. महाराष्ट्र सरकारनं पुरवणी अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पहिली अंतिम मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत होती. मात्र, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत वाढवण्यात आली होती. आता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. योजनेमध्ये आतापर्यंत २ कोटी ४० लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. ही आकडेवारी २४ सप्टेंबरपर्यंतची आहे. अधिकाअधिक महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.