भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आमदार अमोल जावळे यांचा सत्कार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर मतदारसंघाचे नवनिर्वाचित युवा आमदार अमोल जावळे यांचा भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. रावेर मतदारसंघात काँग्रेसचा ४३५६२ मतांनी पराभव करत मोठ्या फरकाने विजय मिळवल्याबद्दल फडणवीस यांनी जावळे यांचे कौतुक केले.
२०१९ च्या निवडणुकीत रावेर मतदारसंघ काँग्रेसकडे होता, मात्र २०२४ च्या निवडणुकीत अमोल जावळे यांनी काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. जावळे यांना एकूण १,१३,६७६ मते मिळाली.
यावेळी फडणवीस यांनी रावेर मतदारसंघाच्या विजयाला अभिमानाचा अध्याय संबोधले आणि जावळे यांच्या कार्यकुशलतेचे विशेष कौतुक केले. या सत्कारप्रसंगी राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन, चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण, तसेच भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर, जावळे यांनी महाराष्ट्राच्या विकासाला समर्पित असलेल्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन” (MITRA) संस्थेचे सीईओ प्रविण परदेशी (माजी सनदी अधिकारी) यांची भेट घेतली. या भेटीत रावेर विधानसभा क्षेत्रातील समस्या आणि त्यावरील उपायांवर सखोल चर्चा झाली. क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी योजना आखण्याचा निर्धार करण्यात आला.
आमदार अमोल जावळे यांनी रावेर मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी योगदान देण्याचा निश्चय या प्रसंगी व्यक्त केला आणि स्थानिक जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याची ग्वाही दिली.