आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणं कठीण होईल…; राणेंचा शरद पवारांना इशारा
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : गुवाहाटीत बसून बहुमत सिद्ध होत नाही. त्यासाठी मुंबईत याव लागेल, असं शरद पवार म्हणाले होते यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पवारांना इशारा दिली आहे. आमदारांच्या केसाला धक्का लावाल तर घर गाठणं कठीण होईल, अशा शब्दात राणेंनी पवारांवर निशाणा साधला आहे.
शरद पवार साहेब शिंदे गटाला धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल. आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. असे उत्तर नारायण राणे यांनी पवारांना दिले आहे.
आमदारांनी बंड केल्यास कार्यकर्ते त्यांच्यामागे जात नाहीत. शिवसैनिक मात्र कायम नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहतात. बंडखोरांना पराभूत करण्यासाठी शिवसैनिक जीवाचं रान करतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे, असा उघड उघड इशाराच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना दिला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी पवारांना प्रतिउत्तर दिले आहे.