शेवटी मुक्ताईनगरात भाजपच्या कमळाची माघार !
मुख्य संपादक– भानुदास भारंबे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क |
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे अशातच जळगांव जिल्ह्यातील महत्वाचा असलेला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे. या मतदासंघावर भाजपचे कमळ फुलत आले आहे, माञ आता पारंपरिक भाजपचा राहिलेला या मतदारसंघावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला होता परंतु, प्रतिपर्धी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला किंबहुना रोहिणी खडसेंना लढत देईल भाजपकडे प्रभावी चेहरा नसल्यानें सेफ गेम खेळत मुक्ताईनगर मतदासंघांतून कमळाने माघारीचे दोर हाती घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजप आपला गड कायम राखण्यासाठी मध्यंतरी चांगलाच कामाला लागला. आमची जागा आम्हीच लढविणार असा बंडाचा विडा भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी उचलला आणि तसा दबाव वरिष्ठांवर टाकण्यास सुरुवात देखील केली. गेली अनेक वर्षे १९९० पासून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपातही भारतीय जनता पक्षाकडे राहिला. सुरुवातीपासून हा मतदारसंघ भाजपचा हक्काचा आणि बालेकिल्ला राहिला आहे. येथे भाजपाचा आमदार राहिला आहे. भाजपाचे तत्कालीन ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे या मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करीत होते. २०१९ चा अपवाद वगळता भाजपचाच उमेदवार विजयी झालेला आहे.
सन २०१९ मध्येही भाजपाने निवडणूक लढविली होती. तेव्हा एकनाथराव खडसेंचा पत्ता कट करीत त्यांची कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना उमेदवारी देत भाजपानेच (खडसेचा पडद्या आड) काटा काढत राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना छुपे बळ दिले होते. त्यावेळी पक्षातर्गत राजकारणाचा कुरघोडी झाल्याने ही जागा भाजपाला गमवावी लागली होती असेही आरोप त्या वेळी झाले होते. २०१९ मध्ये भाजपचा उमेदवार अवघ्या १८०० मतांनी पराभूत झाला होता आणि तेव्हा अपक्ष तथा राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील हे निवडून आले होते.
पारंपारिक भाजपचा मतदासंघ असल्याने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी असा आग्रह मुक्ताईनगर मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते भाजप पक्षश्रेष्ठींकडे केलेला होता. त्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. असे असताना पारंपरिक युतीतला हक्काचा मतदारसंघ भाजप एवढ्या सहजा सहजी सोडेल ती भाजप कशी ? त्यामुळे मतदासंघात तत्कालीन भाजप नेते व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आहे. यांचे प्राबल्य पाहता व जातीय समीकरणाचा विचार करत भाजपकडे माजी मंत्री खडसेंना लढत देईल असा चेहऱ्याचा अभाव व पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याने विजयाची फारशी शाश्वती नसल्याने भाजपच्या कमळाला पराभवाची नामुष्की नको म्हणुन की काय सेफ गेम खेळत शेवटी मुक्ताईनगरात भाजपच्या कमळाने माघार घेतल्याचे म्हणता येईल. शेवटी महायुती कडून शिंदे शिवसेनेचे आ. चंद्रकांत पाटील हे निवडणूक लढत आहेत.