बोदवडात शाब्दीक वादातून एकमेकांच्या विरूध्द गुन्हे !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : बोदवड तालुक्यातील दोन राजकीय पदाधिकार्यांनी शाब्दीक वादातून एकमेकांच्या विरूध्द पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदरील पप्रकरणामुळे शहराच्या राजकीय वातावरण तापल्याचे दृश्य निर्माण झाले.
याबाबत वृत्त असे की, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास पाटील यांच्याबद्दल युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांनी अकबर जलील मुलतानी यांच्याजवळ अपशब्द काढल्याने याप्रकरणी रामदास पाटील यांनी त्यांना जाब विचारला असता शाब्दिक बाचाबाची होऊन वाद झाला व थेट पोलिस स्थानकात गेला. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी पोलीस स्थानकात गर्दी केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पोलिस स्थानक गाठत पोलिस निरीक्षकांशी तासभर तेथे थांबून चर्चा केली. यावेळी प्रा. पाटील व पाटील यांच्यात मनोमिलनाचा प्रयत्न पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या दालनात करण्यात आला मात्र त्यात अपयश आल्याने दोघांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्याने त्यानुसार दोघांनी एकमेकांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केले. परंतु राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी शेवटी माध्यस्थि करत रात्री उशीरा दोघ पाटलांमध्ये मनोमीलन घडवून आणले.