विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह चुलत सासरे अटकेत !
बोदवड, मंडे टू मंडे वृत्तसेवा: विवाहित महिलेस मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, चुलत सासरा-सासू यांचेविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
गोरक्षनाथ नगर मधील रहिवासी भावना निलेश महाजन (वय २७) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सदर महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन तिच्या माहेरच्या नातलगांनी जळगाव येथे करण्याचा आग्रह धरल्याने सदर महिलेचा मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता.
या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ भूषण अशोक माळी (रा. आसोदा) याने बहिणीस मुलबाळ होत नसल्याचे कारणाने मानसिक व शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले अशी फिर्याद दिल्याने मयत महिलेचा पती निलेश सुभाष महाजन, चुलत सासरा प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन यांचे यांचे विरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात भा. द. वि. क. ३०६,४९८अ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी मयत महिलेचा पती नीलेश महाजन व चुलत सासरे प्रकाश महाजन यांना अटक करण्यात आली आहेत.