बोदवडला आ. गिरीश महाजन व आ.चंद्रकांत पाटील यांच्यात गुप्त खलबत : खडसेंना शह देण्याची रणनीती ?
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : बोदवड नगरपंचायत निवडणूकी प्रचारा दरम्यान भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन व मुक्ताईनगरचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांची बंद दाराआड झालेल्या भेटीने चर्चाना उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसेंना शह देण्यासाठी या भेटीत रणनीती आखली गेली नाही ना ? अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा काल सायंकाळी थंडावल्या आहे १८ जानेवारी रोजी बोदवड नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप तिघे पक्ष आमने सामने उभे थाटले आहेत. मात्र, काल रविवारी रोजी प्रचार संपल्यानंतर आ. गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनंतराव कुलकर्णी यांच्या घरी दोन्ही नेत्यांनी निवडणुकीबाबत चर्चा झाल्याने खडसेंना शह देण्यासाठी या बैठकीत छुपी रणनीती आखली गेली असावी, अशीही एक चर्चा रंगली आहे. याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी समीकरणे अगदी विपरीत असल्याचे राजकीय चित्र आहे. कारण एकनाथ खडसे यांना टक्कर देण्यासाठी गिरीश महाजन व शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील एकत्र आल्याची चर्चा आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड खलबतं झाली आहेत. ऐन मतदानाच्या आधी या दोन्ही नेत्यांमधील झालेली भेट ही निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणारी ठरू शकते असे जाणकारांचे मत आहे. तर या भेटीतून मुक्ताईनगर मतदारसंघात खडसेना रोखण्यासाठी एक नव्या युतीच्या राजकीय समीकरनाची भविष्यातील नांदी असल्याचेही मानले जात आहे. मात्र यात सत्य किती हे येणाऱ्या निवडणुकीतील १९ जानेवारी रोजी मतमोजणी निकालावर स्पष्ट होणार आहे.