ब्रेकिंग : २० वर्षीय तरुणावर चाकुने सपासप वार करत खुन, जिल्ह्यात खून सत्र सुरूच
पाचोरा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l किरकोळ कारणावरून धारदार चाकूने पोटात सपासप वार करुन २० वर्षीय तरुण हेमंत सोनवणे याचा खुन केल्याची घटना पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात मध्यरात्री १२:३० वाजता घडली.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात १८ फेब्रुवारी मंगळवार रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक संपल्यानंतर रात्री १२ वाजुन १५ मिनिटांनी हेमंत संजय सोनवणे. वय २० वर्ष. रा. जुना माहेजी नाका, महात्मा फुले नगर, पाचोरा यास रोहित गजानन लोणारी. वय २० वर्ष. रा. शिव कॉलनी, पाचोरा याने किरकोळ कारणावरून धारदार चाकूने पोटात वार करुन गंभीर जखमी केले. हेमंत सोनवणे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना तेथून तो लागलीच पसार झाला.
सदर घटने बाबत पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना माहिती मिळताच त्यांच्या पथकासह ते घटनास्थळी दाखल होत गंभीर जखमी असलेल्या हेमंत सोनवणे यास खाजगी रुग्णालयात तत्काळ दाखल केले. गंभीर जखमी असल्याने
हेमंत सोनवणे याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ जळगाव येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान हेमंत सोनवणे याचा मृत्यू झाला.
खून का केला? कशासाठी केला? हे अद्याप उघडं झालेले नसले तरी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये रोहित गजानन लोणारी. वय २० वर्ष. रा. शिव कॉलनी, पाचोरा याचे विरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन रोहित लोणारी ला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.या घटनेचा पोलिस निरीक्षक अशोक पवार हे पुढील तपास करीत आहेत.