भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

ब्रेकिंग : महायुतीच्या रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळला

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर लोकसभेच्या महायुतीच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर आज दिनांक २६ एप्रिल रोजी अपक्ष उमेदवार संजय प्रल्हाद कांडेलकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात लेखी अर्ज देऊन आक्षेप घेतला परंतु अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी आक्षेप घेतांना पुरावे सादर न केल्याने सदर आक्षेप फेटाळण्यात येत असल्याचे व भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांचा अर्ज वैध असल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय दिला आहे.

दरम्यान आक्षेप फेटाळल्या नंतर या निर्णया विरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी सांगितलं.

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेले आदेश पुढील प्रमाणे —
ज्याअर्थी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 करिता 04-रावेर लोकसभा मतदार संघांतर्गत दि. 25/04/2024 पर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया दि. 26/04/2024 रोजी स. 11.00 वा. आयोजित करण्यात आली होती व सर्व उपस्थितांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या आहेत;

आणि ज्याअर्थी नानिर्देशित उमेदवार श्रीमती खडसे रक्षा निखिल यांचे नामनिर्देशनपत्र क्र. 24/HP/2024/RO, क्र. 25/HP/2024/RO व क्र. 27/HP/2024/RO यांच्या छाननी वेळी इतर नामनिर्दिष्ट उमेदवार श्री. संजय प्रल्हाद कांडेलकर यांनी स. 11.26 वा. तोंडी आक्षेप घेतला असता, त्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले व तोपर्यंत सदर तीनही अर्जाची छाननी प्रक्रिया तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यात येऊन पुढील नामनिर्देशित उमेदवारांचे अर्ज छाननीसाठी घेण्यात आली.

आणि ज्याअर्थी श्री. संजय प्रल्हाद कांडेलकर यांनी आज दि. 26/04/2024 रोजी स. 11.49 वा लेखी स्वरुपात 02 प्रतींमध्ये आक्षेप सादर केला आहे. सदर आक्षेप अर्जाची प्रत , उमेदवार श्रीमती खडसे रक्षा निखिल यांचे निवडणूक प्रतिनिधी श्री. तुषार किसन राणे यांना पुरविण्यात आली आहे.

सदर लेखी आक्षेपातील तपशिल पुढीलप्रमाणे आहे
“उमेदवार श्रीमती खडसे रक्षा निखिल यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांमध्ये त्यांचेवर गौणखनिज प्रकरणात एस.आय.टी. चौकशी अहवालामध्ये संपूर्ण परिवारामध्ये 137 कोटी दंड बुडविला म्हणून त्यांचेवर त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्ता यावर बोजे बसविणेबाबत आदेश असताना त्यांना या प्रकरणात सहज स्थगिती दिलेली असता, या प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई, औरंगाबाद येथे अपील दाखल केलेले आहे व त्यावर दि. 30/04/2024 रोजी म्हणणे सादर करावे, असे मा. न्यायालयाने सांगितले आहे. तरी, मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून छाननी अर्जावर निर्णय घेण्यात यावा.”

आणि ज्याअर्थी प्रकरणात आक्षेपक श्री. संजय प्रल्हाद कांडेलकर (उमेदवार) यांचा आक्षेप हा कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय दाखल केलेला आहे व सदर आक्षेपाच्या पृष्ठ्यर्थ कोणताही पुरावा सादर केलेला नाही; तसेच, सदरच्या आक्षेप अर्जामध्ये त्यांनी कुठेही नामनिर्देशित उमेदवार श्रीमती खडसे रक्षा निखिल यांचे नामनिर्देशनपत्र क्र. 24/HP/2024/RO. क्र. 25/HP/2024/RO व क्र. 27/HP/2024/RO हे अवैध ठरविण्यात यावेत, अशी मागणी केल्याचे दिसून येत नाही;

आणि ज्याअर्थी नामनिर्देशित उमेदवारांची नमूना 3 अ मधील दैनंदिन यादी दि. 25/04/2024 रोजी दु. 03.00 वाजेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द केलेली आहे. तसेच, उमेदवारांच्या शपथपत्रांच्या प्रतीही नोटीस बोर्डवर आणि मा. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या आहेत. आक्षेपक यांनी आवश्यकता असल्यास प्रति-शपथपत्र (Counter Affidavit) दाखल करण्याची मुभा असतांनाही तसे कोणतेही प्रति-शपथपत्र (Counter Affidavit) दाखल केलेले नाही. तसेच त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे सदर प्रकरण मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे न्यायप्रविष्ट आहे;

त्याअर्थी उपरोक्त सर्व बाबीचा विचार करता, सदर आक्षेप फेटाळण्यात येत आहे. तसेच, नामनिर्देशित उमेदवार श्रीमती खडसे रक्षा निखिल यांचे नामनिर्देशनपत्र क्र. 24/HP/2024/RO, क्र. 25/HP/2024/RO व क्र. 27/HP/2024/RO इतर सर्व बाबीने परिपूर्ण असल्याने “वैध ठरविण्यात येत आहेत.

सदर आदेश हा श्रीमती खडसे रक्षा निखिल यांचे नामनिर्देशनपत्र क्र. 24/HP/2024/RO,क्र. 25/HP/2024/RO व क्र. 27/HP/2024/RO मधील भाग पाच (नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय) भाग असेल.

सदर आदेश आज दि. 26/04/2024 रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी पारीत केला असे.सदर आदेश 04 -रावेर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी आज दिनांक 26 एप्रिल रोजी जारी केले आहे. या प्रमाणे आक्षेप फेटाळण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!