ब्रेकिंग : जळगाव एमआयडीसीत भीषण आग, संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या चटई कंपनीला रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची तीव्रता अधिक असून आग आणि धुराचे लोळ उठत आहेत. आज लागलेल्या कंपनीत चटई ला लागणारे केमिकल व इतर ज्वालाग्राही वस्तू असल्याने आग आटोक्यात आणणे मोठे कठीण होते. तासाभरात ४ ते ५ बंब संपले परंतु आग आटोक्यात आणता आली नाही.
अधिक माहितीनुसार, जळगाव एमआयडीसी परिसरात उमेश यशवंत चौधरी रा.सन्मित्र कॉलनी यांच्या मालकीची डी सेक्टरमध्ये सिद्धिविनायक इंडस्ट्रीज नावाची चटई कंपनी आणि सूर्यफूल गोडावून आहे. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कंपनीत सुरक्षारक्षकाच्या खोलीत अचानक आग लागली. कंपनीत तयार चटई आणि प्लास्टिक दाणे कच्चा माल असल्याने आग लागलीच पसरली. काही वेळातच संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
आग विझवण्यासाठी जळगाव अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बंब घेऊन पोहचले असता आग विझवण्याचे प्रयत्न रात्री उशिरा पर्यंत सुरू होते, तासाभरात ४ ते ५ बंब संपले परंतु आग आटोक्यात येण्याची लक्षणे दिसत नव्हती. त्याच वेळी कंपनीत एक गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, तहसीलदार शीतल राजपूत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह कर्मचारी रात्री उशिरा पर्यंत लक्ष ठेवून होते.रात्री उशिरा पर्यंत आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.