ब्रेकिंग : जळगाव मध्ये हत्या, प्राणघातक हल्ल्यात २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, ७ गंभीर जखमी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पूर्ववैमनस्यातून घरातील कुटुंबावर चॉपर आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात १९ जानेवारी रविवार रोजी सकाळी १० वाजता घडली. या प्राणघातक हल्ल्यात मुकेश रमेश शिरसाठ , वय- २६ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव. या तरुणाचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरामध्ये राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबावर जुन्या वादातून दोन गटात आठ दहा जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये मुकेश रमेश शिरसाठ (वय- २६ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव. याचा मृत्यू झाला असून निळकंठ सुखदेव शिरसाट (वय-४५), कोमल निळकंठ शिरसाठ (वय २०), करण निळकंठ शिरसाठ (वय-२५), ललिता निळकंठ शिरसाठ (वय-३०), मुकेश रमेश शिरसाठ (वय-२६), सनी निळकंठ शिरसाठ (वय २१, सर्व रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
यातील मुकेश रमेश शिरसाठ (वय-२६) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या गटातील आणखी दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ही घटना घडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सपोनि विठ्ठल पाटील व त्यांचे सहकारी, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच शासकीय रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.