महाराष्ट्रशैक्षणिक

BREAKING NEWS : १० वी, १२ वी परीक्षा केंद्रांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर, व्हिडिओ चित्रीकरणही होणार

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी आता प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी, परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी ड्रोन कॅमेरा, भरारी पथक, व्हिडिओ चित्रीकरण असे विविध मार्ग अवलंबण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.

परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे नजर
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण मंडळामार्फत राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का ? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. असे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत.

व्हिडिओ चित्रीकरण, बैठे पथक, आणि भरारी पथके
परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागांचे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे.

फेशियल रेकग्निशनने तपासणी
जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधीत घटकांची फेशियल रेकग्निशन सिस्टीमद्वारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल.
परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येतील तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात येईल. महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टीसेस ॲक्ट १९८२ या कायद्याची अंमलबजावणी करुन तसेच कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.

बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रयत्न करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!