ब्रेकिंग : पाणीपुरी खातायं, सावधान! जळगाव जिल्ह्यात पाणीपुरी खाणं महाग, ८० जणांना विषबाधा
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आपल्याला पाणीपुरी आवडते, खातायं, सावधान! जळगाव जिल्ह्यात पाणीपुरी खाणं नागरिकांना चांगलंच महागात पडल्याचं दिसून आलं आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील कमळगावच्या आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ८० जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्रास झाल्यानंतर रूग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
मिळालेली माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील पिंप्री, चांदसणी कमळगाव इथल्या लोकांनी पाणी पुरी खाल्यानंतर त्यांना सकाळी उलट्या, जुलाब, पोट दुखण्याचा त्रास सुरु झाला आहे. ८० पैकी ३० रुग्ण चोपडा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येतंय. याशिवाय तसंच इतर रुग्ण खासगी आणि जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलंय. तर १० रुग्णांवर चोपड्याच्या अडावद येथे उपचार सुरू आहे.
रूग्णांना अडावद प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय आणि खाजगी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी भरती करण्यात आलंय. यामध्ये लहान बालकांपासून वयोवृद्ध नागरिकांच्या समावेश आहे. बाधित नागरिकांना उलटी मळमळ पोटदुखी होत असल्याचा त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी पाणीपुरी खाल्ल्याचं समोर आलं आहे.
या रुग्णांवर चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर सागर पाटील, डॉक्टर पवन पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले आहे. रुग्णालयात रुग्ण ऍडमिट झाले त्यावेळेस वीज पुरवठा खंडित असल्याने डॉक्टरांनी या परिस्थितीत रुग्णांवर अंधारातच उपचार घ्यावे लागले. सदर रुग्णांना फूड पॉईझन झाल्याने या रूग्णांवर प्राथमिक उपचार केले असं डॉक्टर पवन पाटील यांनी रूग्णांविषयी माहिती देताना सांगितले.