ब्रेकिंग : शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या कारवर दगडफेक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या कारवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील बाबा पेट्रोल पंपाजवळील महावीर चौकात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ आपल्या कुटुंबियांसोबत कारने कामानिमित्त बाहेर गेले होते. आमदार शिरसाठ यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगी आणि मुलगा देखील होते. तेथून परतत असताना त्यांची कार रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील बाबा पेट्रोल पंपाजवळ आली. यावेळी बाबा पेट्रोल पंपाजवळ काही लोकांचे भांडण सुरू होते. ही भांडणे सोडवण्यासाठी आमदार संजय शिरसाठ यांनी कार थांबवली. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने आमदार शिरसाठ यांच्या कारवर दगड फेकला. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हा प्रकार कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, घटनेनंतर शहरातील शिवसैनिकांनी बाबा पेट्रोल पंपाकडे धाव घेतली.कारवर नेमका दगड कुणी भिरकावला याचा तपास पोलीस करीत आहेत.