पैसे पडल्याचे सांगून दोन अज्ञात इसमांनी केले गाडीच्या डिक्कीतुन पैसे लंपास !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
नाशिक, निशाद साळवे : जिल्ह्यातील लासलगाव येथील लोटस हॉस्पिटलच्या पुढे दुपारी सव्वादोन वाजेच्या दरम्यान गंगाधर लक्ष्मण पारखे दुचाकीवरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी पैसे पडल्याचे सांगून मोटार सायकलच्या डिक्की तोडून ५७ हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.लासलगावमध्ये गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ७ तोळे सोने लुटून नेल्याची घटना ताजी असतांना पुन्हा पैसे लुटल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गंगाधर लक्ष्मण पारखे (वय ६०, रा. कानळद, ता. निफाड) यांनी मोटरसायकल (क्र. एमएच ४१ आर २५९४ ) ही तीन दिवसांपूर्वी लासलगाव येथे गॅरेजवर कामासाठी लावलेली होती. दि ७ जुलै रोजी गाडी घेण्यासाठी व बँकेतून पैसे काढण्यासाठी लासलगावात पुतण्या महेद्र माधव पारखे यांच्या मोटर सायकलवर आले. स्टेट बँकेतून ६५ हजार रुपये काढून गाडी घेण्यासाठी गॅरेजवर गेले व फिटरला ७,२०० रुपये दिले. पिशवीत असलेले ५७,८०० रुपये पिशवीसह मोटर सायकलच्या डीक्कीत ठेवले. दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घरी जाण्यासाठी विंचुर मार्गे निघाले. लोटस हॉस्पिटलच्या पुढे पाठीमागून आलेल्या मोटरसायकल वरील दोन मुलांनी बाबा तुमचे पैसे रोडवर पडलेले आहे, असे सांगितले.
पारखे यांनी मोटरसायकल रोडच्या बाजूला उभी करुन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीजवळ गाडी लावली. गाडीच्या खाली उतरुन पैसे उचलून खिशात ठेवले व मोटरसायकलजवळ आले असता मोटरसायकलची डीकी फुटलेली दिसली. त्यात असलेले ५७ हजार ८०० रुपये चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे, पोलीस नाईक कैलास महाजन, प्रदीप आजगे हे करीत आहे