ब्रेकिंग : विधानसभा उमेदवाराच्या घरावर दुचाकीस्वारांकडून गोळीबार, जळगाव जिल्ह्यातील दुसरी घटना
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विधानसभा निवडणुकीतील एका अपक्ष उमेदवाराच्या घरावर २ राऊंड फायर करून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दि.१८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील शेरा चौक येथे घडली.
एमआयएम पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अहमद हुसेन शेख (वय ५०, रा. शेरा चौक, तांबापुरा परिसर, जळगाव) हे
विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असून ते शेरा चौकात राहतात. शिक्षक म्हणून शिक्षण सेवा करीत आहेत. दरम्यान, सोमवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी मोठ्या पहाटे सर्व झोपेत असताना साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्या शेरा चौकातील घरावर २ राऊंड फायर केले. यात त्यांच्या घराच्या खिडकीचा काच फुटला आहे.
घटनेची माहिती कळताच कुटुंबीय खडबडून जागे झाले. त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला ही घटना कळवली. नागरिकांना घटना कळताच अहमद शेख यांच्या घराजवळ गर्दी केली. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, एमआयडीसी पोलीस स्टेशन निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असता त्यात घटना कैद झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान हल्लेखोरांची माहिती काढून त्यांचा शोध घेणे सुरू झाले आहे.
याबाबत फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रारदार गेले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली. दरम्यान, अहमद शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सकाळी गाढ झोपेत असताना अचानक काहीतरी फुटल्याचा आवाज आला. थोड्यावेळाने पाहिले तर खिडकीचा काच तुटलेला दिसला आणि एक गोळी दिसली. आणखी एक गोळी पोलीस शोधण्याचे काम करीत आहे. घटनेमागे नेमके काय कारण असू शकते हे निश्चित सांगता येत नाही. याप्रकरणी एलसीबी व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तपास करीत आहेत.
उमेदवारावर गोळीबाराचा जिल्ह्यातील दुसरा प्रकार
या पूर्वीही जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर बोदवड येथे एका प्रचार रॅली दरम्यान काही तरुणांनी गोळीबार केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता हा दुसरा प्रकार जिल्ह्यात घडला आहे.