भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचाळीसगावजळगाव

लाचप्रकारणी जि.प अभियंत्यांसह दोघांना सक्तमजुरी

जळगाव (प्रतिनिधी)। चाळीसगाव तालुक्यातील भोरस बुद्रृक ते चाळीसगाव पर्यंतच्या रस्त्याचे काम झाल्यानंतर कामाचे मोजमाप करून बिले मंजुर करण्‍यासाठी संबंधित ठेकेदाराला जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता राजेंद्र गणपत मोरे यांनी वीस हजारांची रूपयांची लाचेची मागणी केली होती.या प्रकरणात लाच दुसऱ्‍या इसमाच्या माध्यमातून स्वीकारल्याच्या प्रकरणात शुक्रवारी दि. २५ रोजी न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी अभियंत्यासह दोघा आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. त्यात लाचेची मागणी करणाऱ्या आरोपी जिल्हा परिषद अभियंताला ४ वर्षाची तर लाच स्विकारणाऱ्यास तीन वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात तत्कालीन जि. प. सीईओ आस्तिककुमार पांडेय व पोलीस उपअधीक्षक डी. डी. गवारे यांच्यासह चौघांची साक्ष महत्पूर्ण ठरली.

सविस्तर असे की, चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील सुनील पाटील हे खाजगी ठेकेदाराचा व्यवसाय करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करतात. सन २०१५ मध्‍ये त्यांनी भोरस बुद्रृक ते चाळीसगाव पर्यंतच्या रस्त्याचे काम केले होते. त्यावेळी रस्त्याचे कामाचे मोजमाप करून बिल मंजुर करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील चाळीसगाव उपविभागीय कार्यालयामधील शाखा अभियंता राजेंद्र मोरे यांच्याकडे होते. मात्र, सहा महिन्यांपासून ते टाळाटाळ करीत होते. सुनील पाटील यांच्या कामकाजाचे मोजमाप करून बिले मंजुर करण्‍यासाठी २१ जानेवारी २०१५ रोजी शाखा अभियंता मोरे यांनी २० हजार रूपये लाचेची मागणी केली. रक्कम मोरे यांनी खाजगी इसम शेषराव अहिरराव याच्या मार्फत स्वीकारली व लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले होते. अभियंता राजेंद्र गणपत मोरे (५४, रा. चाळीसगाव) आणि शेषराव ऊर्फ भोला अहिरराव (५३, खेडी खुर्द, ता.चाळीसगाव) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत.

तपास पूर्ण केल्यानंतर तपासी अधिकारी डी.डी.गवारे यांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर हा खटला न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात चालला. यावेळी सरकारपक्षातर्फे मोहन देशपांडे यांनी चार साक्षीदार तपासले. त्यात तक्रारदार सुनील पाटील, दिगंबर पाटील, तत्कालीन जि.प.सीईओ आस्तिककुमार पांडेय व तपास अधिकारी डी.डी.गवारे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

या लाच प्रकरणामध्ये न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी शुक्रवारी दि. २५ रोजी निकाल दिला. त्यात अभियंत्या राजेंद्र मोरेसह त्याच्या खाजगी इसम शेषराव अहिरराव यांना दोषी ठरविण्‍यात आले आहे. त्यात खाजगी इसम शेषराव अहिरराव याला लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १२ नुसार ३ वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. तसेच लाचेची मागणी करणाऱ्‍या राजेंद्र गणपत मोरे यास लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ नुसार तीन वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रूपयांचा दंड आणि कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम १३ (१)(ड) व १३ (२) नुसार चार वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाचे आदेश केले असून दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे ॲड.मोहन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!